Amit Shah | (Photo courtesy: amitshah.co.in)

खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना धमकी दिली आहे. स्वत:ला शीख नेता म्हणवणाऱ्या अमृतपालने अमित शाह यांची अवस्था माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखीच होईल, असे म्हटले आहे. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अमृतपाल हा 'वारीस पंजाब दे' नावाच्या फुटीरतावादी संघटनेचा प्रमुख आहे.

सोमवारी पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील बुद्धसिंग वाला गावात दिवंगत पंजाबी गायक दीप सिद्धू याच्या पुण्यतिथी कार्यक्रमात अमृतपाल सहभागी झाला होता,  त्यावेळी त्याने ही धमकी दिली. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असे शाह यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

अमित शहा यांच्या या वक्तव्याबाबत अमृतपालला विचारले असता तो म्हणाला, ‘शाह यांना सांगा की, पंजाबच्या प्रत्येक मुलाला खलिस्तान हवा आहे व ते कोणत्याही परिस्थितीत साध्य होईल. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. आम्ही आमचे शासन मागत आहोत, दुसऱ्याचे नाही. 500 वर्षे आमच्या पूर्वजांनी या भूमीवर आपले रक्त सांडले आहे. या भूमीसाठी अनेकांनी त्याग केला आहे. आम्ही या जागेचे दावेदार आहोत व इथे दावा ठोकण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. ना इंदिराजी अडवू शकल्या, ना मोदी किंवा अमित शहा.’

अमृतपाल म्हणाला, ‘इंदिरा गांधींनी जेव्हा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची अवस्था काय झाली हे आपण पाहिलेच. तुम्ही देखील ते करून पहा, बघा काय अवस्था होते. जगभरातून सैन्य घेऊन या, पण आम्ही आमचा हक्क सोडणार नाही.’ अमृतपालने इंदिरा गांधी यांचे उदाहरण देत ज्या प्रकारे अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे, त्याची सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. (हेही वाचा: Subramanian Swamy on CEC: उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजप खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांचा पाठिंबा)

कथित शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी दीप सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर अमृतपालला 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख बनवण्यात आले होते. अमृतपाल दुबईत राहतो. काही काळापूर्वी तो भारतात आला आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये जनरल सिंह भिंडरांवाला याच्या हातून सुवर्ण मंदिर मुक्त करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार केले. त्यानंतर 2 शीख सुरक्षा कर्मचाऱ्यांनी इंदिरा गांधींची हत्या केली होती. अमृतपाल या जनरल सिंह भिंडरांवाला आपला आदर्श मानतो.