टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त उद्यमाने सुरु असलेली एअरलाइन कंपनी, विस्ताराने (Vistara) विमानात ‘वाय-फाय’ (Wi-Fi) सेवा सुरू केली आहे. विस्तारा ही कंपनी विमानामध्ये वाय-फाय ऑफर करणारी देशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे. आज त्यांनी याबाबत घोषणा केली. बोईंग 787-9 ड्रीमलाइनर विमानामध्ये (Boeing 787-9 Dreamliner Aircraft) ही सुविधा मिळणार आहे. हे विमान नुकतेच कंपनीच्या ताफ्यात सामील झाले आहे. 18 सप्टेंबर, शुक्रवारपासून प्रवाश्यांसाठी वाय-फायची सुविधा उपलब्ध असणार आहे. पुढे ही सुविधा एअरबस ए 321 निओ विमानातही सुरु होणार आहे. ही विमाने दिल्ली ते लंडन (Delhi-London) अशा मार्गावर धावतात.
सरकारने अलीकडेच देशाच्या हवाई क्षेत्रात विमानाच्या आत वाय-फाय वापरण्यास परवानगी दिली होती. फेब्रुवारीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, टाटा समूहाची कंपनी नेल्को आणि पॅनासोनिक एव्हिओनिक्स कॉर्पोरेशनने भारतातील विमान सेवांसाठी करार केला होता. नेल्को एक व्हीसॅट सेवा प्रदाता आहे, ज्यास सरकारकडून व्हीसॅट लिंक बी मिळाला आहे. डेटा मिळाल्यावर हवाई प्रवासी विमाना दरम्यान व्हॉट्सअॅप तसेच इतर इंटरनेट सुविधांचा वापर करू शकतील. मे 2018 पूर्वी, भारतीय हवाई क्षेत्रामध्ये उड्डाण करणाऱ्या विमानाकडे डेटा किंवा फोन सेवा देण्याची मान्यता नव्हती.
(हेही वाचा: Vodafone Idea ने लॉन्च केला 351 रुपयांचा नवा Work From Home प्लॅन, युजर्सला 100GB डेटाचा घेता येणार लाभ)
नंतर हे निर्बंध हटविण्यात आले असल्याने आता 18 सप्टेंबरपासून विमानामध्ये वाय-फाय सेवा मिळणार आहे. जिओ स्टेशनरी सॅटेलाइटच्या मदतीने इन-फ्लाइट वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे. जिओ उपग्रह पृथ्वीच्या वेगाच्या प्रमाणात फिरतो, जेणेकरून तो त्याच ठिकाणी स्थिर राहील आणि कम्युनिकेशन सेवा पुरवत राहील. आता ही सेवा उपलब्ध होत असल्याने, प्रवासी विमानात वाय-फायच्या मदतीने स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ई-बुक आणि स्मार्टवॉच यासारखी उपकरणे वापरण्यास सक्षम असतील.