Passenger Arrest at Delhi Airport: एअर इंडियाच्या (Air India) एका प्रवाशाला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 69 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करताना पकडण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेद्दाह ते दिल्लीच्या फ्लाइट एआय 992 दरम्यान त्याने कोणताही नाश्ता स्वीकारण्यास, काहीही खाण्यास तसेच पिण्यास नकार दिला होता. यामुळे त्याच्याविरुद्ध संशय निर्माण झाला. परिणामी त्याला अटक करण्यात आली.
माहितीनुसार, विमान दिल्लीत आल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवाशावर बारीक नजर ठेवली. ग्रीन कस्टम क्लिअरन्स चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला थांबवण्यात आले आणि नंतर चौकशी करण्यात आली. चौकशीत प्रवाशाने गुदाशयात सोने लपवल्याची कबुली दिली.
प्रवाशाने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये 69 लाखांहून अधिक किमतीचे सोने चार ओव्हल कॅप्सूलच्या रूपात लपवले होते. सहआयुक्त (सीमाशुल्क) मोनिका यादव यांनी सुमारे 1096.76 ग्रॅम सोने जप्त करण्यात आल्याची पुष्टी केली. सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, केबिन क्रूला लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेये नाकारणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, कारण हे शरीरामधून सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नांचे लक्षण असू शकते. (हेही वाचा: VIDEO: अमूल ब्रँडच्या ताकात सापडला किडे? ग्राहकाने व्हिडिओ शेअर करून कंपनीकडे केली तक्रार)
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जेद्दाह ते दिल्लीब हा साधारण साडेपाच तासांचा विमान प्रवास आहे. या फ्लाईटमध्ये एअर होस्टेसने आरोपी प्रवाशाला पाणी, चहा, जेवण आणि इतर अल्पोपहाराची ऑफर दिली होती, मात्र त्याने काहीही घेण्यास नकार दिला. इतकेच नाही तर, तो सतत काहीही घेण्यास नकार देत राहिला. त्यामुळे क्रू मेंबर्सना संशय आला आणि त्यांनी कॅप्टनला माहिती दिली. यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाची कसून झडती घेण्यात आली. यावेळी प्रवाशाने गुदाशयात सोने लपल्याचे उघड झाले.