पोलिसांची भीती ही राहिलीच पाहिजे. पोलिसांची भीती राहिली नाही तर गुंडाराज येईल. त्यामुळे विकास दुबे पोलीस एन्काऊंटर ( Vikas Dubey Encounter) प्रकरणाचे कोणी राजकारण करु नये. तसेच गुन्हेगारीचेही राजकारण करु नये, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. विकास दुबे हा गुन्हेगार होता. तो एका रात्रीत तयार झाला नाही. त्याचे अनेक पक्षांच्या राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते, त्यामुळे त्याला राजकीय वरदहस्त होता, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, पुर्वी गुन्हेगार राजकारणात येऊ पाहायचे. आता राजकारणातच गुन्हेगारी आली आहे. त्याला अनेक राजकीय पक्ष, त्या पक्षातील राजकीय नेते खतपाणी घालतात. त्यामळे हे गुन्हेगार अधिक मोठे होत जातात. विकास दुबे हा साधू संत नव्हता. गुन्हेगारच होता. अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचाही त्यात समावेश होता. त्याने आठ पोलिसांचे प्राण घेतले होते. त्यामुळे त्याच्या एन्काऊंटरचे कोणीही राजकारण करु नये, असेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Vikas Dubey Encounter: कानपूर पोलिस हत्या प्रकरणातील मास्टर माईंड विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू)
दरम्यान, राजकाणात आलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत म्हणाले की, उत्तर प्रदेश पोलिसांनी जे केले ते योग्यच केले. पोलिसांच्या कारवाईवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करु नये. ज्या गुंडांनी पोलिसांची हत्या केली त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला हवे. विकास दुबे याचा एन्काऊंटर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.