Vande Bharat Sleeper Trains: संपूर्ण एसी आणि सर्व आधुनिक सुविधांनी युक्त, वंदे भारत ट्रेन आता सर्वसामान्यांनाही उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर (Vande Bharat Sleeper Trains) व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याची खासियत म्हणजे ही ट्रेन राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत स्लीपर कोचचा पहिला प्रोटोटाइप मार्चपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. अधिका-यांनी सांगितले की त्याची चाचणी एप्रिलमध्ये केली जाईल आणि 2025 च्या अखेरीस ही ट्रेन कार्यान्वित होईल.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार करण्यात आलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्लीपर वंदे भारत ट्रेन रात्रभर प्रवासाच्या मार्गांवर चालेल. ती प्रथम दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-हावडा या दोन्ही मार्गांवर चालविली जाऊ शकते. हे मार्ग सर्वाधिक वर्दळीचे असून सध्या दोन्ही मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त आहे.
सध्या 41 वंदे भारत गाड्या सुरू आहेत. यामध्ये 39 गाड्या रुळावर धावत असून दोन गाड्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व वंदे भारत एक्सप्रेस चेअर कार आहेत, म्हणजे त्यात बसून प्रवास करता येतो. या गाड्या रात्रीच्या वेळी त्याच स्थानकांवर परततात. आता रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करता येणार आहे. एकूण 10 स्लीपर वंदे भारत गाड्या तयार केल्या जात आहेत. वरील या दोन मार्गांव्यतिरिक्त, दिल्ली-बेंगलोर, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-गुवाहाटी, दिल्ली-भुवनेश्वर, दिल्ली-पाटणा या मार्गावरही स्लीपर वंदे भारत गाड्या चालवल्या जातील. (हेही वाचा: Bihar Accident: रेल्वे ट्रॅकवर रिल्स बनवणे पडलं महागात, बिहारमध्ये एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत दोघांचा मृत्यू)
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा स्लीपर कोच राजधानी आणि इतर प्रीमियम ट्रेन्सपेक्षा थोडा वेगळा असेल. यामध्ये प्रत्येक डब्यात चार ऐवजी तीन शौचालये असतील. यासोबतच मिनी पॅन्ट्रीही करण्यात येणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण 823 बर्थ असतील. यात प्रवाशांसाठी 823 बर्थ आणि कर्मचाऱ्यांसाठी 34 बर्थ असतील. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, त्यापैकी 11 एसी 3 टायर, 4 एसी 2 टायर आणि 1 डबा फर्स्ट एसी असेल.