सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यासोबत त्यांनी आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांचीही भेट घेतली. यानंतर नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना अदार पूनावाला म्हणाले की, त्यांना अपेक्षा आहे की त्यांच्या कंपनीने भारतात तयार केलेली दुसरी कोविड-19 लस, कोव्होवॅक्स (Covovax) ही 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ऑक्टोबरमध्ये आणि 2022 च्या पहिल्या तिमाहीत लहान मुलांसाठी लाँच केली जाईल. ते पुढे म्हणाले की, सध्या कोणतेही आर्थिक संकट नाही, केंद्र सरकार आम्हाला नेहमीच मदत करत असते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांना लस वितरणाबाबत विचारले असता, ते म्हणाले की आम्ही दरमहा 13 कोटी लसीचा पुरवठा करीत आहोत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अलीकडेच काही अटींच्या अधीन दोन ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर 'कोव्होवॅक्स' लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांना परवानगी देण्याची शिफारस केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ठिकाणी 920 मुलांना या चाचणीमध्ये समाविष्ट केले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे, ज्यात 12-17 आणि 2-11 वयोगटातील प्रत्येक वर्गात 460 मुले समाविष्ट केली जातील.
पूनावाला पुढे म्हणाले की, लसीची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. 2022 च्या पहिल्या तिमाहीत मुलांसाठी कोव्होवॅक्स लस येणार असल्याची गोष्ट ही नक्कीच दिलासादायक आहे. (हेही वाचा: Johnson & Johnson ने आपल्या सिंगल-शॉट लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मागितली परवानगी)
दरम्यान, आतापर्यंत ज्या पद्धतीने चाचणी चालू आहे, ते पाहता ऑक्टोबरपर्यंत ही लस लहान मुलांसाठी लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, Zydus ची ZyCoV-D लस देखील येत्या काळात मुलांसाठी लस म्हणून एक पर्याय असू शकते. कंपनीने भारतात ही लस वापरण्यासाठी मंजुरी मागितली आहे. ही चाचणी 12 ते 18 वर्षांच्या मुलांवर करण्यात आली आहे, त्यामुळे ही लस फार लहान मुलांना देता येणार नाही.