Uttarakhand Accident (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तरकाशी, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत कोसळली आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्ग-94 वर हा भीषण अपघात घडला. बसमध्ये 28-30 जण होते. या अपघातामध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्य करत आहेत. त्याचबरोबर पन्ना जिल्हा प्रशासन या लोकांची माहिती गोळा करत आहे. डीजीपी अशोक कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

या अपघाताबाबत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत पडल्याची माहिती समजल्याने खूप दुःख झाले. याबाबत मी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. एनडीआरएफही लवकरच तेथे पोहोचणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त करत उत्तराखंडमधील बस दुर्घटना अत्यंत दुःखदायक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘या अपघातामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे.’ पंतप्रधानांनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50-50 हजारांची मदत दिली जाईल.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट केले की, ‘उत्तरकाशीच्या डामटाजवळ प्रवासी बसला अपघात झाल्याची दुर्दैवी बातमी मिळाली. माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. तसेच, सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. उत्तरकाशी येथे घडलेल्या अत्यंत दुःखद अपघाताच्या पार्श्वभूमीवर मी स्वतः आपत्ती नियंत्रण कक्षात पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.’ (हेही वाचा: एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने समस्तीपूरमध्ये खळबळ; कर्जामुळे संकटात सापडला होता परिवार)

दरम्यान, बस (UK-04 1541) हरिद्वारहून निघाली होती. ड्रायव्हर आणि कंडक्टरची सीट वगळता, बसमध्ये 28 प्रवासी बसू शकत होते. सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. एसएचओ अशोक कुमार यांनी सांगितले की, 23 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि लोकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.