Uttarakhand: उत्तराखंड मधील हरिद्वार येथे असलेल्या गंगा नदीत अंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एकूण पाच जण हे पिकनिकसाठी उत्तराखंड येथे गेले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. या ग्रुपमधील करण मिश्रा याने असे सांगितले की, ते पिकनिकसाठी मुंबईहून 30 जुलै रोजीच निघाले होते.
बुधवारी दुपारी गंगा नदीत अंघोळीसाठी उतरले. ज्या ठिकाणी हे सर्वजण गेले होते तेथून त्यांचे हॉटेल जवळच होते. मिश्रा याने पुढे असे म्हटले की, तो आणि एका मुलीने नदीत डुबकी मारली आणि पाण्यातून बाहेर आले. मात्र अन्य तीन जण हे आणखी एक डुबकी मारण्यासाठी पुढे खोल पाण्याच्या येथे गेले. मात्र खुप वेळ झाला तरी ते नदीच्या काठावर परतले नाही. तर पाण्याचा वेग खुप असल्याने ते त्यामध्ये वाहून गेले. ही दुर्घटना घडताच आरडाओरड करत मदत मागितली. पण काही केले नाही असे त्याने पुढे म्हटले.(Bengaluru Suicide: नवीन कपडे घेऊन देण्यास आई-वडिलांचा नकार, वाढदिवसाच्या दिवशीच मुलीने घेतला गळफास)
मात्र एका मित्राने तातडीने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधत पोलिसांना या दुर्घटनेबद्दल कळवण्यास सांगितले. त्यानंतर बचाव कार्य सुरु करण्यात आले. सहा तास उलटून गेले तरीही त्या तिघांचा पत्ता लागला नाही. खुप अंधार सुद्धा झाल्याने अखेर बचाव कार्य थांबवावे लागले. मिश्रा याला चौकशीसाठी तपोवन पोलीस स्थानकात नेण्यात आले. वाहून गेलेल्या दोन तरुणी या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी होत्या. तर तरुण हा इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षाला शिकत होता. मिश्रा हा मलाड येथील रहिवाशी असून अन्यजण हे बोरिवली आणि मीरा रोड येथील राहणारे आहेत.