बिहार: अंत्यविधी आटोपून घरी येताच कुटुंबासमोर उभा ठाकला मृत तरुण, वाचा सविस्तर
Mystery (Photo Credits: Pixabay)

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर कितीही इच्छा असली तरी त्याचा परतावा शक्य नसतो. किंबहुना मृत व्यक्ती खरोखरच पुन्हा जिवंत होऊन समोर आल्यास इतरांना तर सोडाच पण त्याच्या कुटुंबाला सुद्धा आनंदाआधी धक्का बसेल हे निश्चित! असाच काहीसा प्रकार अलीकडे मुशहरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत बुधनगर (Budh Nagar) गावी पाहायला मिळाला. सेवानिवृत्त सैनिक रामसेवक ठाकूर यांचा मुलगा संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) हा 25 ऑगस्ट पासून बेपत्ता होता,  याप्रकरणी तपास करताना पोलिसांना एक मृतदेह आढळला, ठाकूर कुटुंबीयांनी या बॉडीची ओळख पटवून हा संजीवचा मृतदेह असल्याचे सांगितले. साहजिकच घरातील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने ठाकूर कुटुंबावर दुःखाचा आघात झाला होता, तरीही जड अंतःकरणाने त्यांनी त्या देहावर अंत्यविधी केले, पण हे सर्व आटोपून घरी परतताच चक्क संजीव त्यांच्यासमोर पुन्हा येऊन उभा ठाकला. यामुळे गांगरून गेलेल्या कुटुंबाला सावरत संजीवने याप्रकरणाचा खुलासा केला.

लोकमत वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, संजीव कुमार 25 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाला. ठाकूर कुटुंबांनी त्याचा तपास घेण्यासाठी अगदी शर्थीचे प्रयत्न केले पण तरीही त्याचा पत्ता न लागल्याने 30 ऑगस्ट रोजी त्यांनी मुशहरी पोलीस स्थानकात संजीव हरवल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसही संजीवक शोध घेत होते. इतक्यात, मीनापुर येथे पोलिसांना नदीत पडलेला मृतदेह आढळला. हा मृतदेह बेपत्ता संजीवचा असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. ज्यावरून त्यांनी ठाकूर कुटुंबाला बोलावून त्याची ओळख पटवून घेतली यावेळेस कुटुंबाने सुद्धा हा संजीवचा असल्याचे सांगत मृतदेह ताब्यात घेतला आणि मग त्याच्यावर अंत्यविधी केले.

वास्तिवक हा मृतदेह संजीवचा नव्हताच, कारण त्याच दिवशी खरा संजीव हा आपल्या कामानिमित्त गावभर गेला होता. तसेच रुग्णालयात पोलिसांनी दाखवलेला मृतदेह संजीव सारखाच होता, त्यामुळे त्यांना गैरसमजूत होऊन ओळख चुकली. याच दिवशी संजीव सुद्धा गावात पोहचला.

दरम्यान,या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकारचा खुलासा झाल्यानंतर कुटुंबीयांचे दुःख आनंदात परिवर्तित होऊन आता या संजीवला पाहण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी ठाकूर यांच्या घरी गर्दी केली आहे.