तरुणाला बेदम मारहाण (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एका पोलीस हवालदाराच्या मुलाने त्याच्या साथीदारांसह दोन मुलांचे कारमधून अपहरण करून त्यांना काठ्या आणि बेल्टने पाच तास मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर त्यांनी या मुलांच्या चेहऱ्यावर लघवी करून त्यांना शूज चाटायला लावले. त्यानंतर या मुलांना बेशुद्ध अवस्थेत कारमधून फेकून देण्यात आले. मारहाण करणाऱ्यांमध्ये स्थानिक गुप्तचर युनिट (LIU) मध्ये तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलच्या मुलाचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कल्याणपूर पोलिसांनी अपहरण आणि खुनी हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अहवालानुसार, कल्याणपूर पोलीस ठाण्याने सांगितले की, 5 ऑक्टोबर 2023 रोजी कॉन्स्टेबल धर्मेंद्र यादव यांचा मुलगा हिमांशू यादव उर्फ सनी याला कल्याणपूरच्या राधापुरम येथील आयटीआयचा विद्यार्थी आयुष द्विवेदी आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आयुषविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आयुष फरार आहे.

या घटनेचा बदला घेण्यासाठी सनीने इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट आयडी तयार केला आणि आयुषशी बोलणे सुरु केले. काही दिवसांनी त्याने आयुषला भेटण्यासाठी बोलावले. आपला मित्र बिट्टू उर्फ ​​अभिषेक सिंगसोबत आयुष दुचाकीने या तरुणीला भेटण्यासाठी सिव्हिल लाइन्स येथे पोहोचला. त्या ठिकाणी आधीच सनी आणि त्याचे साथीदार उपस्थित होते. या ठिकाणी आयुष आणि त्याच्या मित्राला मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आले.

आयुषच्या मित्राला सिव्हिल लाईनमध्येच फेकून दिले आणि गाडीत आयुषचे हातपाय बांधले गेले व तोंडात कापड कोंबले गेले. नंतर त्याला बेल्ट, काठ्या आणि लाथांनी निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर लघवी करून शिवीगाळ केली गेली. काही तासांनंतर आयुषला रस्त्यावर फेकून दिले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी रस्त्याच्या कडेला एक मुलगा रक्तबंबाळ झालेला दिसला तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा: Uttar Pradesh Double Murder: मेहुणीशी लग्न करायचे होते म्हणून पत्नी आणि चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या,ललितपूर येथील घटना)

पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. आयुषला शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आयुषच्या मित्राला सिव्हिल लाईनमध्ये कारमधून फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यालाही मारहाणही करण्यात आली आहे. आता पोलीस त्याचाही जबाब नोंदवत आहेत. आयुष हा जुन्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी आहे.