उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) दारुच्या दुकानांवर आता सरकारी आणि ठेका हे शब्द दिसणार नाहीत. योगी सरकारने (Yogi Adityanath Govt) दारु, बीयर आणि भांग याच्या दुकानांसाठी या दोन शब्दांच्या वापरावर बंदी घातली आहे. या निर्णयानंतर आता दारुच्या सर्व दुकानांच्या साईनबोर्डवरुन 'सरकारी' आणि 'ठेका' हे शब्द हटवण्यात येतील. बुधवारी या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला असून वरुन आलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आतापर्यंत उत्तर प्रदेशात सरकारी दारुचा ठेका, सरकारी बियरचे दुकान, सरकारी भांग ठेका यांसारख्या शब्दप्रयोगांचा वापर केला जात होता. मात्र आता या आदेशानंतर सर्व दारु, बियर आणि भांगेच्या दुकानांच्या साईनबोर्डवरुन सरकारी आणि ठेका शब्द हटवण्यात येईल. (हे ही वाचा: UP's Colleges, Universities to Reopen From Nov 23: योगी सरकारचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात 23 नोव्हेंबरपासून 50 % क्षमतेसह विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरू होणार)
दारु, बियर किंवा भांगेच्या दुकानांचे लायसन्स राज्य सरकारकडून जारी केले जातात. त्यामुळे या दुकांनावर सरकारी असा शब्द लिहिला जातो. तसंच त्यामुळे दुकान लायन्सस प्राप्त आहे, हे देखील लक्षात येते. मात्र योगी सरकारच्या या निर्णयानंतर दुकानांवरील हे शब्द हटवण्यात येतील.
दरम्यान, उत्तर प्रदेशात घरात बारची व्यवस्था करण्यासाठी देखील सरकारचे लायसन्स असणे आवश्यक आहे. नव्या नियमांनुसार, घरात 6 लीटर हून अधिक दारु किंवा बियर असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून लायसन्स घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे हे लायसन्स एका वर्षासाठी व्हॅलिड असेल आणि तुम्हाला प्रत्येक वर्षी ते रिन्यू करावे लागेल.