UP's Colleges, Universities to Reopen From Nov 23: योगी सरकारचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात 23 नोव्हेंबरपासून 50 % क्षमतेसह विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरू होणार
प्रातिनिधिक फोटो (Photo Credits: PTI)

UP's Colleges, Universities to Reopen From Nov 23: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन जवळपास 8 महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सर्व महाविद्यालये (Colleges) आणि विद्यापीठे (Universities) 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी विद्यापीठे व महाविद्यालये सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार, जास्तीत जास्त पंचवीस टक्के विद्यार्थी वर्गात उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. यावेळी महाविद्यालयीन कर्मचार्‍यांना कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व विद्यार्थ्यांनी फेस मास्क घालावे आणि सर्व प्रतिबंधात्मक उपाय करावे, असं आवाहन सरकारने जारी केलेल्या निर्देशात विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. यासंदर्भात अपर मुख्य सचिवांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकारी, उच्च शिक्षण संचालक प्रयागराज, सर्व राज्य व खाजगी विद्यापीठांचे कुलसचिव यांना पत्र लिहिले आहे. (हेही वाचा - भारतासाठी दिलासादायक बातमी! COVID19 च्या प्रकरणांमध्ये 4 महिन्यानंतर सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद)

या गोष्टी लक्षात ठेवा -

  • विद्यार्थ्यांना आरोग्य सेतु अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागेल.
  • विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे गरजेचं आहे.
  • विद्यार्थ्यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम, योग, ताजी फळे खाणे, निरोगी अन्न आणि वेळेवर झोप घेणे आवश्यक आहे.
  • कोविड साथीच्या आजारानंतर विद्यार्थ्यांनी आरोग्य व सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत विद्यापीठे व
  • महाविद्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे.

कोरोना साथीच्या आजारामुळे, यंदा 24 मार्च रोजी देशात संपूर्ण लॉकडाऊन झाल्यानंतर राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद पडली होती. केंद्र सरकारने सुमारे एक महिन्यापूर्वी शैक्षणिक संस्था उघडण्यास परवानगी दिल्यानंतर 9 ते 12 या काळात अनेक राज्यात तसेच उत्तर प्रदेशात वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यात सुमारे 8 महिन्यांनंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत.