उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फारुखाबाद (Farrukhabad) येथे एका माथेफिरुने काल पासून तब्बल 11 तास 23 मुलांना आणि काही महिलांना घरात डांबून ठेवले होते. या मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते, मात्र तरीही या माथेफिरूने सहकार्य न केल्यावर अखेरीस गोळीबार करून पोलिसांना त्याला ठार करावे लागले आणि शेवटी या मुलांची सुटका झाली आहे. प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवास योजनेअंतर्गत घर आणि शौचालय न मिळाल्याने हा व्यक्ती संतप्त होता याच रागातून त्याने या मुलांना ओलीस ठेवत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. पोलीस चकमकीच्या काही काळ आधी त्याने चिठ्ठीमधून हा सर्व प्रकार स्पष्ट केला होता. सुभाष बाथम (Subhash Batham) असे या माथेफिरूने नाव असून त्याने आपली दहा वर्षाच्या मुलीच्या वाढदिवशी पार्टीच्या निमित्ताने या मुलांना आपल्या घरी बोलावले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार ,माथेफिरुसोबत चकमक सुरु असताना त्याच्या पत्नीला जमावाने जबर मारहाण केली आणि त्यात जखमी झालेली असताना उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याने डांबून ठेवलेल्या मुलांमध्ये एक 6 महिन्यांची मुलगी देखील होती मात्र त्याने चकमकीआधी स्वत: या मुलीला पोलिसांच्या हवाली केलं. मात्र बाकी मुलांना त्याने डांबून ठेवलं. जोपर्यंत त्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांची सुखरुप सुटका करण्यास तो तयार नव्हता. उलट त्याने पोलिसांवर गोळीबार आणि हॅन्ड ग्रेनेडचा मारा केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. या ओलिसनाट्यातून सुटकेसाठी काहीच मार्ग नसल्याने अखेरीस गोळीबार करत पोलिसांनी माथेफिरूल ठार केले.
दरम्यान, बाथम याने पोलिसांवर बॉम्बफेक केला असता या हल्ल्यात घराजवळील एक भिंत ढासळून त्यामध्ये काही पोलीस जखमी झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं एनएसजी कमांडोंच्या पथकाची मदत मागितली. तब्बल 11 तासांनंतर हे ओलीस नाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला 10 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.