
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार राज्यात रामराज्य आणण्याचे हजारो दावे करत आहेत, मात्र राज्यातील वास्तव काही वेगळेच दिसत आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील संभळ (Sambhal) जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एक अत्यंत निष्काळजीपणा आणि हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला. जिल्हा रुग्णालयात, एक कुत्रा स्ट्रेचरवर ठेवलेला मृतदेह चाटत असताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यानंतर लगेच सीएमओने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा मृतदेह एका 17 वर्षांच्या मुलीचा असून, तिचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता.
या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यांमध्ये झाकलेला मृतदेह ठेवला आहे व एक कुत्रा या मृतदेहावरील रक्त चाटत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हा मृतदेह ठेवला आहे, ती एक मोकळी जागा आहे. मृतदेहाजवळ रुग्णालयातील कर्मचारी किंवा कुटूंबाचा सदस्य नाही. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, रुग्णालयाने दोन कर्मचार्यांना निलंबित केले आणि त्याबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा: जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून गायब झालेल्या 82 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळला; पोलिस तपास सुरू)
याबाबत जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील कुमार म्हणाले की, ‘रुग्णालय परिसरातील अनेक कुत्र्यांपैकी एकाचे हे काम आहे. आवारात अनेक भटकी कुत्री आहेत. मी चारवेळा महानगरपालिकेकडे पत्र लिहिले आहे पण त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.‘ त्यांनी असेही सांगितले की हा मृतदेह मुलीच्या वडिलांच्या ताब्यात दिल्यानंतर कथित घटना घडली. या ठिकाणी पाहू शकता घटनेचा व्हिडिओ
मृत मुलीचे वडील चरणसिंह यांनी रुग्णालयावर आरोप केला आहे. ते म्हणाले काल अपघातात मुलगी जखमी झाली होती, मात्र तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचार होण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुलाचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेऊन तिला तिथेच सोडण्यात आले. रुग्णालयाने सांगितले की, मृतदेह मुलाच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला होता मात्र ते वॉशरूमला गेल्यानंतर हा प्रकार घडला. दरम्यान, याधीही इथे 1 नोव्हेंबरला भटक्या कुत्र्यांनी शवविच्छेदनगृहात ठेवलेल्या मुलाच्या मृतदेहाचे नाक तोडले होते.