निवडणूक ड्युटी (प्रातिनिधिक प्रतिमा) (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पंचायत निवडणुकीच्या (Panchayat Poll) शेवटच्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. कोरोना विषाणू (Coronavirus) काळात झालेल्या या निवडणुकीत आतापर्यंत ड्यूटीवर असणाऱ्या 577 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. राज्य शिक्षक संघटनेने हा दावा केला आहे. तत्पूर्वी एका वृत्तपत्राने पंचायत निवडणुकांदरम्यान 135 पोलिंग अधिकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली होती, ज्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दखल घेतली होती. आता राज्य शिक्षक संघटनेने उत्तर प्रदेश राज्य निवडणूक आयोगाकडे, पंचायत निवडणुकीत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या 577 शिक्षकांची यादी सोपवली आहे. ही यादी सोपविल्यानंतर राज्य शिक्षक संघटनेने 2 मे रोजी होणारी मतमोजणी तहकूब करण्याची मागणी केली आहे.

वृत्तसंस्था आयएएनएसनुसार उत्तर प्रदेशमधील विविध शिक्षक संघटनांनी असा दावा केला आहे की, राज्यातील पंचायत निवडणुकीत 577 शिक्षक व सहाय्यक कर्मचारी मरण पावले आहेत. उत्तर प्रदेश शिक्षक महासंघाचे अध्यक्ष दिनेश चंद्र शर्मा म्हणाले की, पंचायत निवडणुकांच्या नावाखाली राज्य निवडणूक आयोगाने 71 जिल्ह्यांमधील 577 बेसिक शिक्षकांना संक्रमित केले आहे. आम्ही त्यांची नावे निवडणूक आयोगाकडे सोपवित आहोत. यापूर्वी सरकारच्या वतीने सर्व डीएम, एसपी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना परिपत्रक पाठविण्यात आले होते.

यूपी सरकारने पाठवलेल्या या परिपत्रकात स्पेशल वर्क ऑफिसर एस.के. सिंह यांनी सर्व डीएम, एसपी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात कोरोनामुळे शिक्षकांच्या मृत्यूच्या दाव्यांची चौकशी करण्यास सांगितले होते. 24 तासांत याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. युनियनने आता शिक्षकांना 2 मे रोजी मत मोजणीपासून दूर राहण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: मुंबई पाठोपाठ दिल्लीतही कोरोना लस तुटवडा; कंपन्यांकडून Vaccine आल्यानंतर होणार Vaccination)

शर्मा म्हणाले की, ‘आम्हाला फतेहपूर, बलरामपूर, शामली, अलिगड आणि हमीरपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात निवडणूक ड्युटीवर असलेल्या शिक्षकांच्या आरोग्याविषयी माहिती मिळालेली नाही. मला नंबरची भीती वाटत आहे तसेच या शिक्षकांच्या कुटुंबावरही त्याचा परिणाम झाला आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे.’ मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला कोविडची तयारी व कथित मृत्यूविषयी स्पष्टीकरण मागणारी नोटीस पाठविली होती.