Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदायूंं (Budaun) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. रिपोर्टनुसार, कुंवरगांव येथील बाबट येथे भगत सिंह (Bhagat Singh) ची भूमिका साकारताना अचानक गळफास लागल्याने एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सोबत खेळणाऱ्या मुलांना या घटनेची कल्पना देखील आली नाही. ही सर्व मुलं शहीद बगत सिंह चे नाटक रचत होती. त्यावेळेस त्या मुलाच्या गळ्याला फास आवळला गेला आणि खेळा-खेळात मुलाचा जीव गेला. दरम्यान, कुटुंबियांनी कोणतेही कारवाई न करता मुलाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दुपारी काही मुलं भुरे नामक व्यक्तीच्या घरात खेळत होती. ज्यात त्यांचा 10 वर्षाचा मुलगा शिवम देखील होता. ही सर्व मुले 15 ऑगस्ट साठी शहीद भगत सिंह वर नाटक बसवत होते. त्याचीच तालिम सुरु असताना ही दुर्घटना घडली. शिवमने भगत सिंहची भूमिका हट्टाने मागून घेतली होती. मात्र त्यात त्याचा असा दुर्दैवी अंत झाला. (Leopard Attacks: उत्तराखंडात बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलाचा मृत्यू)

नाटकाची तालिम करताना मुलांनी खाटेवर चढून उंचावर रश्शी बांधून त्याचा फास तयार केला. त्यानंतर भगतसिंह प्रमाणे फासावर लटकणार का, असे मुलांनी विचारताच तो फास गळ्यात घालून लटकला. फास आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र तेथे उपस्थित मुलांना त्याची कल्पना आली नाही. खूप वेळाने शिवम काहीच हालचाल करत नाही, हे लक्षात येताच मुलांनी एकच आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर मुलाचे आई-वडील त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. शिवमच्या आई-वडीलांनी कोणत्याही कारवाई शिवाय मुलावर अंत्यसंस्कार केले.