पंतप्रधान मोदी आणि उर्जित पटेल यांची भेट (Photo Credit-Instagram/PTI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी 9 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यामुळे स्वायत्ततेच्या मुद्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेल्या संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता दिसू लागली आहे.

नरेंद्र मोदींची भेट घेण्यापूर्वी पटेल यांनी पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. केंद्र व रिझर्व्ह बँकेतील संघर्षानंतर प्रथमच मोदी-पटेल समोरासमोर आले. मतभेद दूर करण्यासाठी चर्चा होणे महत्त्वाचे असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांचे संबंध बिघडले होते. बँकेच्या कर्ज वितरणावर असलेले निर्बंध दूर करावे, असे सरकारचे म्हणणे आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआय लहान आणि मोठ्या उद्योगांना कर्ज देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यास तयार आहे. मात्र गैर बँकींग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) साठी रोख देण्याची व्यवस्था सोपी करण्यात आली की नाही, हे समजू शकलेले नाही.

वित्त मंत्रालयने केंद्रीय बँकेविरुद्ध सेक्शन 7 चा वापरणार असल्याचे संकेत दिल्याने आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यामधील तणाव वाढला होता. यांच्यातील तणाव वाढीचे हे सर्वात मोठे कारण होते. आरबीआयच्या इतिहासात प्रथमच असे घडले.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी सांगितले की, "केंद्रीय बँकेला अधिक स्वायत्ता देण्याची गरज आहे. असे न केल्यास अर्थव्यवस्थेसाठी ते धोकादायक ठरु शकते."