उत्तर प्रदेशच्या बरेली (Bareilly) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथल्या बहेदी गावातील एका पित्याने आपल्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मुलीच्या काकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. सर्कल ऑफिसर तेजवीर सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकताना सांगितले की, 3 जानेवारीच्या रात्री केसर नावाच्या व्यक्तीने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मदतीने पहिल्या पत्नीच्या मुलीवर बलात्कार केला.
यावेळी मुलीचा आरडाओरडा कोणीही ऐकू नये म्हणून तिच्या सावत्र आईने मुलीचे तोंड दाबून ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच आरोपी एका प्रकरणात कारागृहातून बाहेर आल्याचे पोलिसांनी सांगितले. आता त्याने आपल्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचे लक्ष्य बनवले आहे. आरोपीच्या दुसऱ्या पत्नीने या प्रकरणात पतीला पूर्ण साथ दिली. सध्या पती-पत्नी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रकरणाचा आणि आरोपीचा सर्व बाजूंनी तपास करत असून पुढील कारवाई करत आहेत. पित्यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना धक्कादायक तर आहेच, पण ही बातमी समोर आल्यानंतर परिसरातही संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी कुटुंबातील इतर सदस्यांना ही माहिती मिळताच तिच्या काका-काकूंनी अल्पवयीन मुलीला पोलीस ठाण्यात आणून घटनेची माहिती दिली. (हेही वाचा: सामुहिक बलात्काराच्या खोट्या प्रकरणात व्यक्तीने भोगली 2 वर्षांची शिक्षा; आता सरकार व पोलिसांवर ठोकला 10 हजार कोटींचा दावा)
पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या काकांच्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बलात्कार करणरे वडील आणि सावत्र आईलाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील रेल्वे गेटजवळ बूट दुरुस्तीचे काम करतो. त्याच्यावर हल्दवानीमध्येही POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.