UP Shocker: समलैंगिक डेटिंग ॲपच्या मदतीने डॉक्टरशी मैत्री; वसतिगृहात बोलावून केला बलात्कार व अनैसर्गिक सेक्स, पैसेही लुटले, BHU मधील आरोपी विद्यार्थ्यांना अटक
Banaras Hindu University (संग्रहित संपादित प्रतिमा)

UP Shocker: बनारस हिंदू विद्यापीठात (Banaras Hindu University) बलात्काराची (Rape) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी एक पुरुष डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अहवालानुसार, बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी समलैंगिक लोकांसाठी असणाऱ्या डेटिंग ॲपच्या मदतीने एका डॉक्टरशी मैत्री केली. त्यानंतर फसवणूक करून या डॉक्टरला वसतिगृहात बोलावून त्याचा शारीरिक छळ केला, त्याच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 हजार रुपयेही लुटले.

या घटनेनंतर संस्थेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून अशा गुन्हेगारी मानसिकतेच्या व अनुशासनहीन विद्यार्थ्यांमुळे संस्थेचे वातावरण बिघडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारीनंतर वाराणसी पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी दोन आरोपी विद्यार्थ्यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

ही घटना लंका पोलीस स्टेशन हद्दीत घडली. माहितीनुसार, बीएचयूमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गे डेटिंग ॲपद्वारे एका डॉक्टरशी मैत्री झाली. 1 जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांनी मित्रावर उपचार करण्याच्या बहाण्याने या डॉक्टरला रविदास गेट येथे बोलावले. त्यानंतर इथून ते त्याला बीएचयु रुईया हॉस्टेलमध्ये घेऊन गेले. यानंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या खोलीला कुलूप लावून डॉक्टर मारहाण करून लुटले. (हेही वाचा; SC on Unmarried Woman and Surrogacy: 'देशात विवाह संस्थेचे संरक्षण केले पाहिजे, पाश्चात्य देशांचे अनुकरण करता येणार नाही'; न्यायालयाने फेटाळली अविवाहित महिलेची सरोगसीची याचिका)

याशिवाय त्याला विवस्त्र करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत, पैसे, सोनसाखळी व सोन्याची अंगठी हिसकावून घेतली. या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर, डीसीपी काशी झोन ​​आरएस गौतम आणि एसीपी अतुल अंजन त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील लंका पोलिसांच्या पथकाने श्रीमन शुक्ला आणि सूरज दुबे या दोन विद्यार्थ्यांना अटक केली. ही घटना घडली तेव्हा या दोन विद्यार्थ्यांसह अन्य तीन जणही खोलीत उपस्थित होते. पाचही आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.