बांगलादेशी महिलेने केले यूपीमधील तरुणाशी लग्न (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या देशात पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी चर्चेत आहे. सीमाने नेपाळमार्गे वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला आणि ती सचिनसोबत राहू लागली. पोलिसांनी तिला अटक करून तिची चौकशी सुरु आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा सीमेवर सतर्क झाल्या आहेत. कारण, उत्तर प्रदेशातील (UP) मुरादाबाद (Moradabad) येथून बांगलादेशातून (Bangladesh) आलेल्या मुस्लिम महिलेचा असाच एक प्रकार समोर आला आहे. मुरादाबादमधील टॅक्सी ड्रायव्हर अजय सैनी फेसबुकच्या माध्यमातून बांगलादेशी ज्युलीच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांनी लग्न केले व आता अजयचे रक्ताने माखलेले फोटो समोर आले आहेत.

माहितीनुसार, अजय सैनी आपली आई सुनीता सैनी आणि दोन भावांसोबत मुरादाबादच्या सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीतील गौतम नगर गावात राहतो, अजयला दोन बहिणीही आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे. अजयची ज्युलीशी दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले. ज्युलीला 11 वर्षांची मुलगी आहे.

यानंतर, 2022 मध्ये एके दिवशी अचानक जुली आपल्या 11 वर्षाच्या मुलीसह मुरादाबाद म्हणजेच अजयच्या घरी पोहोचली. इथे तिने हिंदू धर्म स्वीकारला आणि अजयशी लग्न केले. लग्नानंतर ती सुमारे 15 दिवस अजय आणि त्याच्या कुटुंबियांसोबत राहिली आणि नंतर बांगलादेशला गेली. त्यानंतर काही दिवसांनी ती परत भारतामध्ये आली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी तिने सांगितले की, तिचा व्हिसा संपणार आहे व त्यामुळे तिला बांगलादेशला परत जावे लागेल. व्हिसाचे काम करण्यासाठी अजयदेखील तिच्या सोबत बांगलादेशला गेला. हे काम पूर्ण करून आपण ज्युलीसोबत परत येणार असल्याचे त्याने सांगितले.

मात्र बांगलादेशात पोहोचल्यानंतर अजय आणि ज्युलीचा ना फोन आला ना त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. एके दिवशी बांगलादेशातील एका अनोळखी नंबरवरून अजयचा एक फोटो आला ज्यामध्ये तो रक्ताने माखलेला होता. आता हा फोटो घेऊन अजयची आई सुनीता पोलिसांकडे पोहोचल्या आहेत. (हेही वाचा: Delhi Shocker: प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध; प्रेयसीच्या वडील, भावांनी घेतला 25 वर्षीय तरूणाचा घेतला जीव!)

एसएसपींनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बांगलादेशचा दूतावासही या तपासात गुंतला आहे. या संदर्भात एसएसपी हेमराज मीणा यांनी सांगितले की, इंटेलिजन्स टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे, सध्या तरी ती महिला कोण होती आणि अजयचे बांगलादेशमध्ये काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही, आम्हाला आशा आहे की लवकरच सत्य बाहेर येईल.