Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

यूपीच्या (Uttar Pradesh) बाराबंकी आणि अयोध्येत दहशत माजवणाऱ्या एका सायको किलरला (Psycho Killer) अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अयोध्या पोलिसांनी सायको किलर अमरेंद्र याला मवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. अमरेंद्रने बाराबंकीत तीन तर अयोध्येत एका महिलेची हत्या केली. चार खून झाल्यानंतर पोलीस अमरेंद्रचा शोध घेत होते. यासाठी पोलिसांनी अमरेंद्रचा फोटो सोशल मीडियावरही प्रसिद्ध केला होता.

सायको किलर मध्यमवयीन महिलांना आपला बळी बनवत असे. महिलांवर बलात्कार केल्यानंतर तो त्यांची निर्घृण हत्या करायचा. अटक करण्यात आलेला आरोपी बाराबंकी येथील असंधरा येथील रहिवासी आहे. बाराबंकी पोलिसांच्या 6 टीम्स या सीरियल किलरचा शोध घेत होते. सोशल मीडियावरही या आरोपीचे छायाचित्र शेअर करून पोलिसांनी त्याच्याबद्दल काही माहिती असल्यास ती शेअर करण्याचे आवाहन केले होते.

बाराबंकीच्या रामस्नेहीघाटापासून अयोध्या जिल्ह्यातील मवई पोलीस स्टेशनचा परिसर 8 किमी अंतरावर आहे. 5 डिसेंबर 2022 रोजी मवई येथील खुशेटी गावातील 60 वर्षीय महिला काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत ती न परतल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 6 डिसेंबरला दुपारी पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहावर कपडे नव्हते. महिलेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

यानंतर रामस्नेहीघाट कोतवालीपासून चार किमी अंतरावर इब्राहिमाबाद नावाचे गाव आहे. 17 डिसेंबर 2022 रोजी येथील एका शेतातून 62 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. सायंकाळी मृतदेह सापडला, मात्र सकाळीच तिचा खून झाला होता. या मृतदेहावरही एकही कपडा नव्हता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कारानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

यानंतर 29 डिसेंबर रोजी रामस्नेहीघाट पोलीस ठाण्यापासून 3 किमी अंतरावर असलेल्या ठेठरहा गावात शौचास गेलेली महिला बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह 30 डिसेंबर रोजी शेतात नग्नावस्थेत आढळून आला होता. ही महिलाही 55 वर्षांची होती आणि खुनाचा प्रकारही तसाच होता. हा मृतदेह सापडताच पोलिसांना या सर्व हत्या एकाच व्यक्तीने केल्याची खात्री झाली. हा सायको किलर वृद्ध आणि मध्यमवयीन महिलांना लक्ष्य करत होता. (हेही वाचा: पतीने पत्नीवर केला 52 जणांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप; उच्च न्यायालयाने म्हणाले, 'महिला आरोपी होऊ शकत नाही')

यानंतर त्याला पकडण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली. अयोध्येतील रुदौली सर्कलचे डेप्युटी एसपी सत्येंद्र भूषण तिवारी यांनी सांगितले की, मवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उनहौना गावातून त्यांना माहिती मिळाली की मंगळवारी एका व्यक्तीने एका महिलेवर हल्ला केला आणि बलात्कार करून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीला पकडले. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने बाराबंकी आणि अयोध्येतील इतर महिलांवर बलात्कार करून आणि हत्या केल्याचे उघड झाले.