Bike Stunts | (Photo Credits: Twitter/ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बरेली-नैनिताल महामार्ग नजिक काही तरुण आपल्या दुचाकीवरुन स्टंट (Bike Stunts) करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) झाला आहे. या व्हिडिओत एकदोन नव्हे तर केवळ तीन दुचाकीवरुन तब्बल 14 तरुण स्टंट करत होते. महामार्ग सुरक्षा पोलिसांनी हटकताच हे तरुण पळून गेले. प्राप्त माहितीनुसार हे सर्व तरुण सोशल मीडियावर (Social Media) रिल्स बनविण्यासाठी हे स्टंट करत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी रस्तेसुरक्षेसोबतच इतरही मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, तरुणांनी केलेल्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. हा व्हिडिओ रविवारी शूट करण्यात आल्याची माहिती आहे. बरेलीचे एसएसपी अखिलेश कुमार चौरसिया यांनी सांगितले की, लवकरच तरुणांचा ठावठिकाणा लागेल. त्यांना तत्काळ अटक करुन पुढील कारवाई सुरु केली जाईल. (हेही वाचा, रेल्वे ट्रॅकवरील स्टंट्स मुळे Instagram Influencer Adarsh Shukla ला अटक; कृत्याबद्दल मागितली माफी (Watch Video))

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "बाईकच्या नंबर प्लेटच्या आधारे आरोपींचा माग काढला जात असून, कायद्यानुसार कारवाई केली जाईल." अशाच एका घटनेत, अमरोहामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय महामार्ग 9 वर स्टंट करणाऱ्या गाड्या यूपी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेत आरोपीं राष्ट्रीय महामार्ग 9 वक आले आणि ते वाहनांसोबत स्टंट करताना आणि स्टंटचे व्हिडिओ बनवताना दिसले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी वाहने जप्त केल्याचा दावा केला.

ट्विट

पाठिमागील काही काळापासून देशभरातील तरुणांमध्ये सोशल मीडिया रिल्सची मोठी क्रेझ पाहायला मिळते आहे. अनेक तरुण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि या प्रसिद्धीची चटक लागल्याने कोणत्याही थराला जात आहेत. अनेकदा तरुण जाणतेपणे किंवा अजानतेपणे कायदा आणि नियमांचेही उल्लंघन करताना आढळून येत आहे. त्यातील अनेकांवर कायदेशीर कारवाईसुद्धा झालेली आहे. काही युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील क्रेझ कमी करण्यासाठी सरकारनेच आता प्रयत्न करावे, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.