उन्नाव (Unnao) मधील बलात्कार (Rape) पीडित तरुणीच्या निधनाने संपूर्ण देश ढवळून निघाला असतानाच याच शहरातील दुसऱ्या एका महिलेने पोलिसांच्या बाबत एक धक्कादायक खुलासा आज तक वाहिनीकडे केला आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी उन्नाव मधील या महिलेवर काही नराधमांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तिला तिथून पळ काढण्यात यश आले या प्रसंगाची तक्रार पोलिसांकडे केली असता पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे तिला तुझ्यावर अजून बलात्कार झाला नाही ना.. झाल्यावर बघुयात असे उत्तर दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. यावर उत्तर देताना महिलेने पोलिसांना पलटवार करत आता मी निदान जिवंत आहे बलात्कार झाल्यावर मी तक्रार करायला सुद्धा येऊ शकणार नाही असे सांगत पुन्हा मदत मागितली मात्र यावर पोलिसांनी दुर्लक्ष करत हा विषय तिथेच दाबून टाकला. हाच प्रकार मागील तीन महिने सलग घडत असल्याचे देखील महिलेने सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार, साधारण तीन महिन्यांपूर्वी औषध घेऊन घरी परतत असताना या महिलेवर नराधमांनी हल्ला केला. यावेळी सुद्धा तत्परता दाखवत महिलेने 1090 या हेल्पलाइनवर संपर्क साधला. पोलिसांनी तेव्हा आपण काहीच वेळात जिप्सी पाठवत आहोत असे सांगितले मात्र वास्तवात असे काहीच घडले नाही. काही वेळाने पोलीस कप्तान कक्षात संपर्क केला असता त्यांनी ही घटना ज्या हद्दीत घडली तिथेच थेट तक्रार नोंदवण्यास सांगितले. या सर्व प्रकाराला कंटाळवून महिलेने काहीच महिनाभरापूर्वी थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे, मात्र अजूनही यावर सुनावणी झालेली नाही तसेच कोणत्याही आरोपीला अटक देखील करण्यात आलेली नाही, असे समजते.
दरम्यान, या काळात महिलेला पोलीस ठाण्याच्या वाऱ्या काही हुकत नाहीयेत, तसेच पोलीस स्थानकात गेल्यावर मदतीच्या ऐवजी आता पुन्हा आलात का? असे प्रश्न करून टोमणे मारले जात असल्याचे देखील महिलेचे म्हणणे आहे. आज तक सोबत बोलत असताना महिलेने पोलिसांच्या या वागणुकीचा खुलासा केला तसेच पोलीस हे रक्षकांहून त्रासदायक होत असल्याने मनस्ताप होत आहे असेही मत व्यक्त केले आहे.