Bhaiyyu Maharaj & Ramdas Athawale | (Archived and representative images)

भैय्यू महाराज ( Bhaiyyu Maharaj) आत्महत्या करणं शक्य नाही. मी त्यांना जवळून ओळखत होतो. त्यांचे आणि माझे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या अंत्यसंस्कारालाही मी उपस्थित होतो. त्यांच्या मृत्यमध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनीही मला सांगितलं की, ते आत्महत्या करणं शक्य नाही. त्यांची हत्याच झाली असावी असा संशय केंद्री सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Union minister Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला आहे. भैय्यू महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी व्हावी. त्यासाठी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यातयात यावी अशी मागणीही आपण केली असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भय्यू महाराज यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा तपास केला जावा यासाठी आपण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशीही चर्चा केली असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. या तपासाबाबत कमलनाथ यांच्याशी आपली फोनवरुन चर्चा झाली. तसेच, त्याबाबत आपण त्यांना एक पत्रही पाठवल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. या पत्राला कमलनाथ यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, आठवले यांच्या विधानमुळे भैय्यू महाराज मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (हेही वाचा, भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी फरार सेवक विनायक दुधाळे अटकेत)

12 जून 2018 या दिवशी भैय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, अल्पावधीतच हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असे समजून या प्रकरणाची चौकशी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, भैय्यू महाराज यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला एका वकिलांकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. कैलास पाटील यांने निवेश बडजात्या नावाच्या वकिलाला पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.