अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारणीसाठी शिवसेना (Shivsena)  पक्षाकडून 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली आहे. आज अनेक शिवसेना कार्यकर्ते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांच्या सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी गेले आहेत, रामलल्लांचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधला. राममंदिर उभारणी हे आम्हा सर्वांचे स्वप्न होते, त्यामुळे आता ट्रस्ट उभारून जेव्हा मंदिरासाठी निधी घेणारे अकाउंट उघडण्यात आले आहे तर सरकार कडून किंवा पक्षाकडून नव्हे तर शिवसेनेच्या ट्रस्ट कडून 1 कोटी रुपयांचा निधी देणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासोबतच, महाराष्टातून जे भाविक राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत त्यांच्या सोयीसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारण्याची इच्छा आहे, याकरिता उत्तरात प्रदेश योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने काही जमीन द्यावी अशी मागणी सुद्धा उद्धव यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यातून चंद्रकांत पाटील यांच्यासहित भाजपला टोलवण्याची काम सुद्धा केले, मी जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो प्रामाणिक श्रद्धेतून अयोध्येत दर्शनाला आलो होतो, जे लोक आता आमच्यावर टीका करत आहेत,त्यांना आधी अयोध्येत येऊ तर दे. असे उद्धव यांनी म्हंटले आहे. तर, भाजप सोडून महाविकासाआघाडी स्थापन करण्याच्या बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून, आम्ही भाजपची साथ सोडली आहे, हिंदुत्वाची नाही, तसेच भाजप आणि हिंदुत्व वेगवेगळे आहे. असेही ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे सरकारने 100 दिवसांत काय केलं? पहा सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 111 सेकंदात 'हा' व्हिडिओ

दरम्यान, जेव्हा जेव्हा आपण अयोध्येत येतो तेव्हा तेव्हा आपल्यासोबत काहीतरे सकारात्मक घडते, मागील वेळी नोव्हेंबर मध्ये अयोष्येला आलो असता नोव्हेंबर मध्येच मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली, म्ह्णूनच पुन्हा पुन्हा शक्य होईल तेव्हा अयोध्येत येत राहणार असेही उद्धव यांनी सांगितले आहे. यावेळेस सुद्धा अयोध्या दौर्यात शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती, मात्र कोरोना व्हायरसमुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत असल्याचे सांगत ठाकरेंनी खेद व्यक्त केला.