कोरोनाचा नवा प्रकार, Omicron बाबत देशात आणि जगात खळबळ उडाली आहे. आता Omicron व्हेरिएंट भारतामध्येही आल्याने चिंता अजून वाढली आहे. कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी सरकार लसीकरणावर भर देत आहे. लसीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय सरकार घेत असतानाच, माजी मंत्री आणि भाजपचे नेते मात्र कोरोनावर मात करण्याचे चित्र-विचित्र उपचार सांगत आहेत. भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या देवी सिंह भाटी (Devi Singh Bhati) यांनी दावा केला आहे की, लिंबाच्या दोन थेंबांनी कोरोना चुटकीसरशी पळून जाईल.
माजी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 वर अॅलोपॅथीमध्ये कोणताही इलाज नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक डॉक्टरांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत, परंतु या आजारावर आयुर्वेद पद्धतीने उपचार शक्य आहेत. माजी मंत्री जोधपूर सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी अशी वक्तव्ये केली. तज्ज्ञांच्या मते, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. चांगली प्रतिकारशक्ती कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त आहे, परंतु लिंबू हा कोरोनावर खात्रीशीर इलाज ठरू शकत नाही.
माजी मंत्री देवी सिंह भाटी यांनी कधीही महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. परंतु याबाबत त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वी जोधपूरच्या सर्किट हाऊसमध्ये देवी सिंह भाटी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. यावेळी त्यांनी पाठदुखीपासून आराम मिळावा यासाठी उपस्थित लोकांना सूचनाही दिल्या. (हेही वाचा: राजस्थानमध्ये 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन)
दरम्यान, यापूर्वीही कोरोनाच्या उपचारासाठी आयुर्वेदिक उपचारांचे दावे केले गेले आहेत. मात्र, आयुर्वेदिक उपाय किती प्रभावी आहेत हे अद्याप सिद्ध झालेले नाही. दुसरीकडे, राजस्थानमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर राज्यात बरीच खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचा हा नवा धोकादायक प्रकार 35 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. तज्ञांनी देखील हा प्रकार आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रकार असल्याचे सांगितले आहे.