नव्या डिजिटल नियम पालनावरुन (Digital Rules 2021) केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter ) यांच्यात चांगलाच सामना रंगला. अखेर ट्विटरने केंद्र सरकारला माहिती देताना म्हटले आहे की, आम्ही नवे डिजिटल नियम (New Digital Rules) पाळण्याचा कसोशिने प्रयत्न करु. तसेच, येत्या आठवडाभरात आम्ही नियम पालनाबाबतीतची प्रगती आपल्याला कळवू. नव्या नियम पालनास टाळाटाळ करणारी ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी काहीशी नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे. ट्विटरने सरकारला पाठविलेल्या एका संदेशात म्हटले आहे की, ते डिजिटल नियमांचे पालण करण्यासाठी पावले टाकत आहेत. डिजिटल नियमांच्या पालनाबाबतची अद्यावत माहितीही ते एक आठवडाभरात केंद्र सरकारला देणार आहे.
दरम्यान, ट्विटरने काही दिवसांपूर्वीच आरएसएस (RSS) सरसंघचालक मोहन भागवत, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि इतरही भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक(Blue Tag) हटविण्यात आली होती. या कारवाईनंतर माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT Ministry) ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला होता. नव्या डिजिटल नियमांचे (Digital Guidelines 2021) लवकरात लवकर पालन करा अन्यथा कारवाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
भारतात फेसबुक, गूगलसह इतरही अनेक कंपन्यांनी डिजिटल नियमांप्रमाणे तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याबाबत पावले टाकली आहेत. परंतू, ट्विटरने मात्र हे नियम पाळण्यास काहीसा विरोध दर्शवला होता. ज्यावरुन केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात एक प्रकारचा संघर्ष सुरु होता. ट्वटिरच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते की, ट्विटर भारतातील आपल्या सेवेबद्दल कटीबद्ध आहे. तसेच, एक महत्त्वाचा लोकसंवाद मंच म्हणून कार्यरत आहे.
जवळपास दीड वर्षांपासून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात विविध मुद्द्यांवरुन तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. शेतकरी आंदोलनावेळीही ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात टूलकिटवरुन संघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर भाजप प्रवक्ते यांनी ट्विटर वर शेअर केलेले ट्विट मीडिया मॅन्युप्युलीटेड असल्याचे ट्विटरने म्हटले त्यावरुनही संघर्ष पाहायला मिळाला. आपल्या ट्विटमध्ये संबित पात्रा यांनी काँग्रेसने टूलकीट बनविल्याचा आरोप केला होता.