Cyclone | Image Used For Representational Purpose (Photo Credits: Wikimedia Commons)

आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘असानी’ चक्रीवादळाचा (Cyclone Asani) प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. आता एका सॅटेलाइट चित्रामुळे नवीन अडचणी वाढल्या आहेत. या फोटोवरून, हिंदी महासागराच्या दक्षिण भागात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. हिंदी महासागरात 'असानी' सोबत आणखी एक चक्रीवादळ वेगाने आकार घेत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

दक्षिण आफ्रिकन देश सेशेल्सने याला 'करिम' (Cyclone Karim) असे नाव दिले आहे. हे वादळ सध्या 112 किमी प्रतितास वेगाने पुढे जात आहे, जे नंतर 140 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकेल. चक्रीवादळ ‘असानी’ 110 किमी प्रतितास वेगाने किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकत आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, असानीच्या प्रभावामुळे ताशी 120 किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (हेही वाचा: असानी चक्रीवादळाचा 6 राज्यांना फटका, अनेक ठिकाणी विमानोड्डाण रद्द, मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत)

हे वादळ काल आंध्र-ओडिशा किनारपट्टीवरून पश्चिम-मध्य आणि वायव्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर ते ईशान्येकडे वळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हे चक्रीवादळ बुधवारपासून निष्क्रिय होण्यास सुरुवात होईल. द वेदर चॅनेलच्या मते, असनीने अंदमान समुद्रावर सक्रिय होण्यास सुरुवात केल्यावर लगेचच 8 मे 2022 रोजी दक्षिण हिंद महासागरात करीम चक्रीवादळ उदयास आले.

वेदर चॅनलने पुढे नमूद केले आहे की, जेव्हा अशी दुहेरी वादळे एकमेकांच्या जवळ असतात, म्हणजेच 1,000 किमीच्या आत असतात, तेव्हा ते एकमेकांवर परिणाम करतात. माहितीनुसार, असानी आणि करीम यांच्यातील अंतर 2,800 किमी पेक्षा जास्त असल्याने त्यांचा एकमेकांवर परिणाम होण्याची शक्यता नव्हती. युनायटेड स्टेट्स नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, दोन चक्रीवादळे विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेकडे विरुद्ध दिशेने जात आहेत. अशीच घटना एप्रिल/मे 2019 मध्ये चक्रीवादळ फनी आणि चक्रीवादळ लोर्ना सोबत दिसली.