तुर्कस्तान (Turkey) आणि सीरिया (Syria) या दोन्ही देशांमध्ये झालेल्या भयंकर भूकंपामध्ये (Turkey, Syria Earthquake) हजारो नागरिकांचा बळी गेला. जीवित आणि वित्त हानी झाली. परंतू, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे. संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) माहिती देतना मंगळवारी (14 फेब्रुवारी) म्हटले की, तुर्कस्तान आणि सीरियामधील भूकंपामुळे 7 दशलक्षाहून अधिक मुले प्रभावित झाली आहेत. यातील हजारो बालके मरण पावल्याचेही संयुक्त राष्ट्रांनी (United Nations On Turkey, Syria Earthquake) म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र बाल संस्था युनिसेफचे प्रवक्ते जेम्स एल्डर यांनी जिनिव्हा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानमध्ये, दोन मोठ्या भूकंपांचा फटका बसलेल्या 10 प्रांतांमध्ये राहणार्या मुलांची एकूण संख्या 4.6 दशलक्ष इतकी होती. तर, सीरियामध्ये सुमारे, 2.5 दशलक्ष मुले बाधित आहेत. (हेही वाचा, Turkey-Syria Earthquake: तुर्किये आणि सीरियामधील भूकंपातील मृतांचा आकडा 35,000 च्या वर; निकृष्ट इमारती बनवणाऱ्या 130 हून अधिक कंत्राटदारांना अटक)
जेम्स एल्डर यांनी सांगितले आहे की, या भूकंपामध्ये हजारो मुलांचा मृत्यू झाल्याची भीती युनिसेफला वाटते आहे. अद्यापही मृत्यू झालेल्या मुलांचा नेमका आकडा पुढे आला नाही. दुर्दैवाने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची भीती जेम्स एल्डर यांनी व्यक्त केली आहे. आपत्तीजनक, आणि सतत वाढत जाणारी, मृत्यूची संख्या लक्षात घेता, ते म्हणाले की हे स्पष्ट आहे की "या विनाशकारी भूकंपात अनेक मुलांनी पालक गमावले असतील.
ढिगाऱ्यांमध्ये, लाखो बेघर लोकांना थंडी आणि उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. मुले असलेली कुटुंबे "रस्त्यावर, मॉल्समध्ये, शाळांमध्ये, मशिदींमध्ये, बसस्थानकांवर आणि पुलांखाली झोपत होती. भूकंपाच्या भीतीने आणि घरे गमावल्याने ही सर्व कुटुंबे भीतीने त्यांच्या मुलांसोबत मोकळ्या भागात राहत होती, जेम्स एल्डर म्हणाले. हायपोथर्मिया आणि श्वासोच्छवासाच्या संसर्गाने ग्रस्त मुलांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येच्या अहवालाकडे लक्ष वेधून जेम्स एल्डर म्हणाले, हजारो कुटुंबे भूकंपाने बेचिराक केली आहेत. या सर्व कुटुंबावर भविष्यात सावरण्याचे प्रचंड मोठे आव्हान असणार आहे.