टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (TRP) घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही प्रमुख (Republic TV Chief) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या भूमिकेविरूद्ध, पुरावा मिळाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. यामुळेच गोस्वामी किंवा चॅनेलला कारवाईपासून कोणतेही संरक्षण देणे चालू ठेवू नये अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आज कोर्टामध्ये रिपब्लिक टीव्हीच्या वकिलाने वरिष्ठ वकील हरीश साळवे हजर राहण्यास असमर्थ असल्याचे नमूद केल्यावर कोर्टाने सुनावणी तहकूब केली. दुसरे वरिष्ठ वकील कुटुंबातील काही वैद्यकीय समस्येमुळे कोर्टात हजर राहू शकले नाहीत.
याप्रकरणी पुढील सुनावणी, 15 जानेवारीपर्यंत पोलिसांनी कोणतीही जबरदस्तीची कारवाई न करण्याचे आश्वासन देण्याचे मान्य केले. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (BARC) तक्रार दिली होती की, जाहिरातींमधून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काही टीव्ही चॅनेल्स त्यांच्या टीआरपी नंबर्सबाबत फेरफार करीत आहेत. अशाप्रकारे मागील वर्षी हा टीआरपीचा कथित घोटाळा उघडकीस आला होता.
आज कोर्टामध्ये मुंबई पोलिसांनी सांगितले की, रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल यांच्यामार्फत चौकशी करून, आम्हाला (मुंबई पोलिसांना) पुरावे सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई न करण्याचे मान्य केले आहे. सुनावणीच्या पुढील तारखेला पोलिस याप्रकरणाच्या चौकशीचा सद्यस्थिती अहवाल सादर करतील असे पोलिसांच्या वकिलांनी सांगितले.
यापूर्वी मागील वर्षी 29 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केला होता. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी दोन वाहिन्यांचे टीआरपी वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना 'लाखो रुपये' दिले असल्याचे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा: बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आयकर विभागाकडून रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी)
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार या टीआरपी घोटाळयामध्ये तीन वाहिन्यांचा सहभाग आहे. ज्यामध्ये रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाचा समावेश आहे. ही चॅनेल्स पाहण्यासाठी आणि टीआरपी वाढविण्यासाठी प्रेक्षकांनी 400-500 रुपये दिले गेले.