त्रिपुरातील (Tripura) सिपाहिजाला (Sepahijala) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ओएनजीसी गॅस कलेक्शन स्टेशनजवळ असलेल्या त्रिपुरा स्टेट रायफल्स (TSR) कॅम्पवर जोरदार गोळीबार झाला. त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या जवानाने शनिवारी पश्चिम त्रिपुरामध्ये आपल्या दोन सहकारी सैनिकांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यापैकी एक कंपनी कमांडर होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, टीएसआरच्या 5 व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास (38) असे आरोपीचे नाव आहे. सुकांता दासने रजेसाठी अर्ज केला होता. परंतु त्याची रजा मंजूर होऊनही त्याना सोडले नाही. या प्रकरणावरून त्याचा वरिष्ठांशी वाद झाला.
या वादामधून दासने त्याचे वरिष्ठ सुभेदार मार्का सिंग जमातिया (49) आणि नायब सुभेदार किरण जमातिया (37) यांना गोळ्या घातल्या. दोघेही पाचव्या बटालियनशी संलग्न होते. सिपाहीजला पोलीस अधीक्षक कृष्णेंदू चक्रवर्ती यांनी सांगितले की, गोळ्यांचा आवाज ऐकून बटालियनच्या इतर सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी त्यांना तिथे सुभेदार आणि नायब सुभेदार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. चक्रवर्ती म्हणाले की, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सुभेदार यांना मृत घोषित करण्यात आले, तर नायब सुभेदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
#Tripura govt has decided to give ₹ 5 Lakh each to bereaved families.
They will also get benefits under the Die-in-harness scheme.
2/2
— Biplab Kumar Deb (@BjpBiplab) December 4, 2021
या घटनेनंतर दास यांनी मधुपूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आरोपी रायफलमॅनने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याची रजा मंजूर करूनही त्याला ड्युटीवरून मुक्त करण्यात आले नाही. त्याच्या वरिष्ठांची इच्छा होती की, दास यांनी एका प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहावे. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, यानंतर दोन्ही वरिष्ठांशी जोरदार वाद झाला आणि दासने आपल्या सर्व्हिस रायफलने दोघांवर गोळ्या झाडल्या. (हेही वाचा: Haryana Crime: हरियाणामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीवर झाडल्या गोळ्या, आरोपी अटकेत)
जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी डाय-इन-हार्नेस योजनेअंतर्गत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि सरकारी नोकरीची घोषणा केली. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुकमा येथे सीआरपीएफच्या एका हवालदाराने झोपलेल्या चार साथीदारांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती.