राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणाऱ्या लोकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. अहवालानुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) 1 एप्रिलपासून टोलचे दर (Toll Tax) वाढवण्याची शक्यता आहे. एका खाजगी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, टोलचे दर 5% ते 10% वाढतील. राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील.
विशिष्ट टोल प्रश्नांवर वेळोवेळी आवश्यकतेनुसार धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. आता रस्ते वाहतूक मंत्रालय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टोल दर वाढवण्याच्या प्रस्तावांवर विचार करेल आणि योग्य विचार केल्यानंतर दर मंजूर करू शकेल. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, टोल टॅक्सच्या नवीन दराचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या पीआययुकडून 25 मार्चपर्यंत पाठवला जाईल.
अहवालात पुढे म्हटले आहे की, कार आणि हलक्या वाहनांसाठी टोल दर पाच टक्क्यांपर्यंत वाढेल आणि इतर अवजड वाहनांसाठी तो 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. नुकत्याच सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरही टोलचे दर वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या नव्याने सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या सेक्शनवर प्रत्येक किलोमीटरसाठी 2.19 रुपये आकारले जात असून, त्यात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. (हेही वाचा: GST collection: जीएसटी संकलनात फेब्रुवारीमध्ये 12 टक्के वाढ; 1.49 लाख कोटी जमा)
एका अहवालानुसार, टोल प्लाझाच्या 20 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या लोकांना देण्यात येणाऱ्या मासिक पासच्या सुविधेतही 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही सुविधा सामान्यतः स्वस्त असते. दरम्यान, अहवालानुसार, 2022 च्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गांवर 33,881.22 कोटी रुपये टोल जमा झाला, जो मागील वर्षाच्या संकलनापेक्षा किमान 21 टक्के अधिक होता.