Covid 19 Patients Recovery (Photo Credits: ANI)

भारतात कोरोना व्हायरसचा प्रभाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा, कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू यामुळे नागरिक चिंतेत आहेत. मात्र या चिंतेच्या वातावरणात दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. आज कोरोना बाधित तब्बल 10,000 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची दिलासादायक माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसंच उपचार सुरु असलेल्या रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या 14 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी 10.5 दिवसांचा कालावधी लागत होता. तो आजच्या दिवशी सुमारे 12 दिवसांवर आला आहे. तसंच भारताचा मृत्यू दर जगातील सर्वात कमी असून 3.2% इतका आहे. अशी माहिती देखील आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

भारतात मागील 24 तासांत 2644 नव्या रुग्णांची भर पडली असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 39980 वर पोहचला असून बळींची संख्या 1301 झाली आहे. 10633 रुग्ण यातून पूर्णपणे बरे झाले असून 28046 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची आहे. (भारतातील कोणत्या राज्यांत किती आहेत COVID-19 रुग्ण; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

ANI Tweet:

देशात कोरोना व्हायरसच्या शिरकावाची चाहूल लागताच देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर देखील रुग्णसंख्या वाढत राहिल्याने लॉकडाऊनचा कालावधी 19 दिवसांनी वाढवण्यात आला. तर अद्यापही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने 17 मे पर्यंत देश लॉकडाऊन राहणार आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणा, सरकारच्या प्रयत्नांना यश आल्याने आज तब्बल 10 हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. हे अत्यंत आशादायी चित्र असून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी नियम पाळून सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे.