Jagan Mohan Reddy (PC - Facebook)

तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती लाडूच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेवर उपस्थित केलेले प्रश्न निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या पत्रात चंद्राबाबू नायडू खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, नायडू यांनी राजकीय फायद्यासाठी कोट्यवधी हिंदू भाविकांच्या विश्वासाला दुखावले आहे. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, नायडू यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमवर केलेले आरोप पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

रेड्डी म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांची ही टिप्पणी केवळ टीटीडीच्या पावित्र्याला कलंकित करत नाही तर भक्तांच्या मनात टीटीडीबद्दल शंका निर्माण करते. रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना नायडूंच्या कृतीवर कठोर कारवाई करून सत्य उघड करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन भाविकांचा विश्वास टीटीडीवर कायम राहील. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती लाडूमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. तिरुमला मंदिरात तयार करण्यात आलेल्या प्रसिद्ध लाडूंमध्ये वापरले जाणारे तूप उच्च दर्जाचे नसून त्यात भेसळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी होता.

तपासणी दरम्यान हे खरे असल्याचे निष्पन्न झाल्याचेही ते म्हणाले होते. तपासणीमध्ये तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये बीफ टॅलो, फिश ऑईल, पाम ऑइल आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचे म्हटले होते. आता वायएस जगन मोहन रेड्डी यांनी हा आरोप ठामपणे नाकारला. ते म्हणाले की, टीटीडी प्रसादम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व घटकांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कठोर प्रक्रिया राबवते. रेड्डी म्हणाले की, लाडू बनवण्यासाठी वापरले जाणारे तूप ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे खरेदी केले जाते आणि कठोर गुणवत्ता मानकांवर NABL-प्रमाणित प्रयोगशाळेच्या चाचण्यांतर्गत त्याची चाचणी केली जाते. (हेही वाचा: Tirupati Laddu Controversy: तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरले गेले पाम तेल आणि प्राण्यांची चरबी; TDP चा गंभीर आरोप, शेअर केला NABL चाचणी अहवाल)

वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या संपूर्ण वादाला चंद्राबाबू नायडूंचा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या पत्रात टीटीडीचे पावित्र्य राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. ते म्हणाले की, टीटीडीवरील असे निराधार आरोप भाविकांच्या श्रद्धेला तडा जाऊ शकतात, त्यामुळे या आरोपांचे खंडन करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे.