Tirupati Temple | Image Used for Representational Purpose (Photo Credit: PTI)

Tirupati Laddu Prasadam Row: सध्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात (Tirumala Tirupati Devasthanams) प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवाबाबत (Laddu) मोठा वाद सुरु आहे. टीडीपीने दावा केला आहे की, वायएसआरसी सरकारच्या कार्यकाळात तिरुमाला मंदिर ट्रस्टच्या प्रसिद्ध लाडू प्रसादममध्ये प्राण्यांच्या चरबीचा आणि पाम तेलाचा वापर केला गेला होता. या वादानंतर आता आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे (तिरुपती मंदिर) शुद्धीकरण करण्यात आले. यासाठी महाशांती यज्ञ केला गेला. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) मंडळाच्या अधिका-यांसह 20 पुजारी सोमवारी सकाळी 6 ते 10 पर्यंत चाललेल्या पंचगव्य परीक्षण (शुद्धीकरण) मध्ये सहभागी झाले होते. विधीमध्ये लाडू आणि अन्नप्रसादम स्वयंपाकघर शुद्ध करण्यात आले.

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीने 18 सप्टेंबर रोजी राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप आणि फिश ऑइल मिसळल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या दिवशी, टीडीपीने प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला आणि आपल्या आरोपांची पुष्टी केल्याचा दावा केला. मात्र जगन मोहन रेड्डी यांनी या आरोपींचे खंडन केले. पुढे हा वाद वाढत गेला.

आता तिरुपती मंदिरातील लाडूंच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. सीएम चंद्राबाबू नायडू म्हणाले की, एसआयटीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. दुसरीकडे, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रसादममध्ये प्राण्यांच्या चरबीच्या वापराची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे. राज्यसभा सदस्य आणि देवस्थानम (TTD) चे माजी अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: Tirupati Laddu Row: ‘धर्म पुनर्स्थापित करण्याची वेळ आली’, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केली 11 दिवसांच्या तपश्चर्येची घोषणा)

दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती लाडूच्या गुणवत्तेवर उपस्थित केलेले प्रश्न निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या पत्रात चंद्राबाबू नायडू खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, नायडू यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमवर केलेले आरोप पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.