तिहार कारागृह सुरक्षित!, इंग्लंडच्या न्यायालयामुळे विजय मल्ल्याची गोची, प्रत्यार्पण शक्य
मद्यसम्राट विजय मल्ल्या (Archived images)

इंग्लंडच्या न्यायालयानेच तिहार कारागृह सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्याने मद्यसम्राट विजय मल्ल्याची चांगलीच गोची झाली आहे. थेट इंग्लंडच्याच न्यायालयाने निर्वाळा दिल्याने विजय मल्ल्याचा भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. क्रिकेट मॅच फिक्सिंगमधील आरोपी संजीव चावला याच्या प्रकरणात आलेला हा निर्णय विजय मल्ल्यासाठी महत्त्वाचा ठरु शकतो.

लंडन हाय कोर्टाचे न्यायमूर्ती लेगाट आणि जस्टिस डिंगमॅन्स यांनी शुक्रवारी दिलेल्या निर्णयात सांगितले की, भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक संजीव चावला यांना तिहार कारागृहात कोणताही धोका नाही. संजीव चावला यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये फिक्सीगचे आरोप आहेत. हे प्रकरण हॅन्सी क्रोनियो मॅच फिक्सिंगबाबतचे आहे. ज्यात भारतीय क्रिकेटपटू अजेय जडेजा आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यावरही आरोप झाले होते.

भारताकडून चावलावरील उपचाराची हमी देण्यात आल्यानंतर लंडनच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. लंडन उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम विजय मल्याच्या प्रकरणावरही होणार आहे. कारण, भारतातील कारागृह असुरक्षित असल्याचे कारण विजय मल्ल्या इग्लंडच्या न्यायालयाला देत असे. त्यामुळे इग्लंडसोबत गुन्हेगार हस्तांतरणाचा भारताचा करार असूनही विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण केले जात नव्हते. (हेही वाचा, एक रुपयाच्या वसुलीसाठी, ८५ रुपयांची नोटीस; बँकेचा चोख कारभार, ९ कोटी बुडवून विजय माल्या मोकाट)

दरम्यान, इतर सुनावनीसाठी हे प्रकरण वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात हस्तांतरीत केले जाणार आहे. इग्लंडचे परराष्ट्रमंत्री चावला यांच्या प्रत्यार्पणाबाबत अंतिम निर्णय घेतील. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. तसेच, लंडनच्या सुप्रिम कोर्टातही या प्रकरणाला आव्हान दिले जाऊ शकते.