आर्थिक मंदीचे कारण देत बिस्कीटांची किंमत वाढणाऱ्या Britannia ला तब्बल 403 कोटींचा फायदा
Britannia Products (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील प्रसिद्ध बिस्किट निर्माता ब्रिटानिया (Britannia) इंडस्ट्रीजला दुसर्‍या तिमाहीत तब्बल 403 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीने आर्थिक मंदीचे कारण सांगत बिस्कीटांच्या किंमती वाढवल्या होत्या, त्यानंतर आता ब्रिटानियाच्या नफ्याचे हे आकडे समोर आले आहेत. ब्रिटानियापूर्वी, देशातील सर्वात मोठी बिस्किट उत्पादक कंपनी, पारले त्यांच्या नफ्यामुळे चांगलीच चर्चेत होती. गेल्या आर्थिक वर्षात पारले समूहाचा निव्वळ नफा 15.2 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर त्याचा महसूलही वाढला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत ब्रिटानियाचा नफा 16.09 टक्क्यांनी वाढून 303.03 कोटी रुपये झाला.

गेल्या आर्थिक वर्षात याच काळात कंपनीचा निव्वळ नफा 261.03 कोटी होता. ब्रिटानियाचे एकूण उत्पन्न 12.22 टक्क्यांनी वाढून 2,913.55 कोटी रुपये झाले, जी मागील वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत 2,596.11 कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 2,202.68 कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून तो 2,454.58 कोटी रुपये झाला आहे. याबाबत बोलताना ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी म्हणाले, ‘कंपनीने दहा अंकी नफा मिळवणारी ही चौथी तिमाही आहे. कंपनीने त्याच्या ब्रँडमध्ये केलेली गुंतवणूक, विविध जाहिरात, वाहिन्यांद्वारे नवीन ओळख तयार करणे, ब्रिटानियाची 100 वर्षे, तसेच कमकुवत उपलब्धता राज्ये आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी वितरण नेटवर्कवर लक्ष केंद्रित केल्यामुळेच हे शक्य झाले आहे. (हेही वाचा: आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या Parle-G ची यावर्षी विक्रमी कमाई; ग्रामीण भागातून सर्वाधिक उत्पन्न)

याआधी ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे बाजार प्रमुख विनय सुब्रमण्यम म्हणाले होते की. ‘गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आर्थिक मंदी चालू आहे त्यामुळे जानेवारीपर्यंतचा कालावधी कंपनीसाठी फार कठीण असणार आहे. त्यामुळेच तिसऱ्या तिमाहीपासून म्हणजे ऑक्टोबरपासून बिस्किटांच्या किंमतींमध्ये थोडीशी वाढ होणार आहे.’ अशाप्रकारे कंपनीने काही बिस्किटांच्या किंमती वाढवल्याही होत्या. सुब्रमण्यम यांच्या म्हणण्यानुसार कंपनीची विक्रीही बरीच कमी होऊन ती अर्ध्यावर आली आहे. मात्र आता कंपनीने दुसऱ्या तिमाहीत तब्बल 400 कोटींपर्यंत मजल मारली आहे.