आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या Parle-G ची यावर्षी विक्रमी कमाई; ग्रामीण भागातून सर्वाधिक उत्पन्न
Parle-G (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील सर्वात मोठी बिस्किट उत्पादक कंपनी, ‘पारले’ (Parle Biscuits) आर्थिक मंदीचा सामना करत होती. दोन महिन्यांपूर्वी कंपनी आपल्या 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या. मात्र आत ‘पारले प्रॉडक्ट’च्या (Parle Products) नफ्यात तब्बल 15.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टॉफलरच्या मते, पारले बिस्किट्सना वित्तीय वर्ष 2019 मध्ये 410 कोटी रुपयांचा नफा झाला, जो मागील वर्षी 355 कोटी इतका होता. कंपनीचा एकूण महसूल 6.4 टक्क्यांनी वाढून 9,030 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षी सुमारे 6 टक्क्यांनी वाढून 8,780 कोटी रुपये झाला होता.

काही दिवसांपूर्वी ‘पारले जी’ने, लोकांकडे 5 रुपयांचा बिस्कीट पुडा विकत घेण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते. मात्र आता यावर्षी पारले जी कंपनीचा नफा 55 कोटी रुपयांनी वाढला आहे. कंपनीने 100 रुपये प्रति किलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्कीटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली होती. या बिस्कीटांवर 12 टक्के जीएसटी आहे जो कमी करून 5 टक्के करावा अशी मागणी होती. बिस्किटांची विक्री कमी झाल्याने कंपनीला मोठे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले होते.  (हेही वाचा: पारले जी बिस्किट कंपनीच्या तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर वरवंटा? कामगार कपात होण्याची शक्यता)

दरम्यान, पारले-जी, मोनाको आणि मारी बिस्किट बनवणाऱ्या पारलेची विक्री 10,000 कोटींपेक्षा जास्त आहे. 10 प्लांट कार्यरत असणारी या कंपनीमध्ये एक लाख कर्मचारी काम करत आहेत. पारलेकडे 125 थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. या बिस्किटांची निम्म्याहून अधिक विक्री ग्रामीण भागातून होत आहे. महत्वाचे म्हणजे कंपनी आजही 5 रुपयांमध्ये हे बिस्कीट विकत आहे.