Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

गेल्या काही वर्षांत जगभरात दहशतवादी हल्ले कमी झाले असले तरी, यांचा धोका पूर्णपणे टळला नाही. कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी संघटना अल कायदा भारतीय उपखंडात आपली स्थानिक संलग्नता आणि संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. अल-कायदा जम्मू-काश्मीर, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे. यासाठी संघटना अफगाणिस्तानातील तालिबानशी संबंध सुधारण्यावर भर देत आहे.

अल कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या कारवायांवर नजर ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) टीमने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानमध्ये अल कायदा पुन्हा एकत्र येत आहे. तसेच, तालिबान-शासित अफगाणिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र बनले आहे. त्याच्या भूमीतून सुमारे 20 अतिरेकी गट कार्यरत आहेत.

पण त्याहून चिंतेची बाब म्हणजे अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या मूळ दहशतवादी संघटनेच्या दक्षिण आशिया-केंद्रित शाखेत सुमारे 200 लढवय्ये अजूनही सक्रिय आहेत आणि ते जम्मू-काश्मीर, बांगलादेश, म्यानमार या भागात कारवायांचे नियोजन करत असतील, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यांचा म्होरक्या दहशतवादी ओसामा महमूद आहे आणि अफगाणिस्तानमध्ये या संघटनेचे 400 सैनिक आहेत. अहवालात असे म्हटले आहे की AQIS काश्मीर ऑपरेशन्ससाठी संलग्न संस्था तयार करत आहे.

अहवालात हे देखील समोर आले आहे की भारतीय उपखंडात काही लोक AQIS शी संबंधित आहेत. त्यांना एकतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हेंट-खोरासानमध्ये सामील व्हायचे आहे किंवा दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधायचा आहे.  यूएनच्या अहवालानुसार अल-कायदा अफगाणिस्तानात छुप्या पद्धतीने काम करते, जेणेकरून तालिबानवर अफगाणिस्तानचा वापर करून दहशतवादी कारवाया वाढविण्यासाठी केल्याचा आरोप करता येणार नाही.

माहितीनुसार, AQIS ची सुरुवात अल-कायदाचा माजी प्रमुख अयमान अल-जवाहिरीने 2014 मध्ये केली होती. आता त्याचा प्रमुख ओसामा महमूद आहे. याआधी 2015 मध्ये दिल्लीत तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर, AQIS ची भारतात उपस्थिती प्रथमच आढळून आली. (हेही वाचा: ब्युटी पार्लरनंतर आता तालिबानने संगीत वाद्यांवर केला फतवा जारी,' संगीत तरुणांना भरकटवते म्हणून; संगीत वाद्य आणि उपकरणे टाकली पेटवून)

दिल्ली पोलिसांनी नंतर AQIS दहशतवादी मौलाना अब्दुल रहमान कासमी याला अटक केली. या दहशतवादी संघटनेने झारखंडच्या जंगलात प्रशिक्षण शिबिर उभारल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, अल-कायदाबद्दल बोलायचे झाले तर, 1980 च्या दशकात अफगाणिस्तान सोव्हिएत युनियनने व्यापला होता.  त्या काळात सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानातून हाकलण्यासाठी अनेक संघटना तयार झाल्या. या संघटनांना अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय यांचे समर्थन होते. अल-कायदाही त्याच वेळी तयार झाली. त्याची स्थापना ओसामा बिन लादेनने केली होती. सोव्हिएत युनियनविरुद्ध लढणाऱ्या मुजाहिदीनचाही त्याला पाठिंबा होता.