घरी, हॉटेल्समध्ये किंवा हॉलमध्ये वाढदिवस (Birthday) साजरा करणे ही बाब अतिशय सामान्य आहे, परंतु आता तुम्हाला तुमचा वाढदिवस चक्क चालत्या ट्रेनमध्ये (Moving Train) साजरा करण्यात येऊ शकणार आहे. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सर्व व्यवस्था करेल. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला काही खर्चही करावा लागणार नाही, यासाठी फक्त तेजस एक्सप्रेसमध्ये (Tejas Express) तिकीट बुक करावे लागेल. तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी IRCTC ने यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे.
आयआरसीटीसीकडे ज्या प्रवाशाने तिकीट बुक केले आहे त्याचा सर्व तपशील असणार आहे. त्याच तपशीलांच्या आधारे IRCTC ला तुमच्या वाढदिवसाची तारीख कळेल आणि आणि तेजस एक्सप्रेसचे कर्मचारी चालत्या ट्रेनमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करतील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने 6 ऑगस्टपासून तेजस एक्सप्रेसचे ऑपरेशन पुन्हा सुरू केले आहे.
या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी IRCTC सातत्याने काही नवीन योजना सुरू करत आहे. यावेळी चालत्या ट्रेनमध्ये वाढदिवस साजरा करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. अशा चालत्या ट्रेनमध्ये, IRCTC अगदी केकपासून इतर सर्व व्यवस्था करेल. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे, जर तुमचे तिकीट इतर कोणी बुक केले असेल अशावेळी तुमच्या वाढदिवसाची माहिती IRCTC ला नसेल, तर केकची आगाऊ व्यवस्था करण्यासाठी प्रवासी स्टेशनवर तेजस एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांना वाढदिवसाची माहिती देऊ शकतो.
लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेसमध्ये आरती मिश्रा आणि अंकुर शुक्ला यांच्या मुलाचा वाढदिवस असाच साजरा केला गेला. दरम्यान, आयआरसीटीसीने तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष भेट योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तेजसच्या निवडक प्रवाशांना प्रवासादरम्यान भेटवस्तू दिल्या जातील. (हेही वाचा: Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाची 25 सप्टेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक)
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भेट योजना 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लागू असेल. या योजनेअंतर्गत, प्रत्येक फेरीत संगणकावरून ड्रॉ काढले जातील. याद्वारे चेअर कारमधील दहा आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधील तीन प्रवाशांची बक्षिसासाठी निवड केली जाईल. शनिवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही बक्षिसे देण्यात येतील.