Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाची 25 सप्टेंबर रोजी 'भारत बंद'ची  हाक
Farmers' Protest | (Photo Credits: PTI)

शेतकऱ्यांचा संयुक्त किसान मोर्चा (Samyukta Kisan Morcha)  केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध (Centre's Three Farm Law) आंदोलन करत आहे. या आंदोलनाला 25 सप्टेंबर रोजी 10 महिने पूर्ण होतील. या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी 'भारत बंद' (Bharat Band) ची हाक देण्यात आली आहे. (Farmers Protest: अजून 8 महिने चालणार शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांची माहिती)

संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल सिंह यांनी लवकरच दिल्ली ठप्प करण्यासाठी दक्षिण हरियाणा आणि मेवात येथील शेतकऱ्यांना तयार राहण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त किसान मोर्चा लवकरच दिल्लीला पूर्णपणे घेरेल आणि त्यानंतर दक्षिण हरिणाया घेरण्याच्या दिशेने वाटचाल करु. तसंच 5 सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर महापंचायतीमध्ये ‘मिशन यूपी’ची घोषणा करू, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक तहसील आणि गावामध्ये संयुक्त किसान मोर्चाची शाखा उघडली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. 5 सप्टेंबर हा दिवस देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक परीक्षा असेल. मेवातच्या शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशला पोहचावे. तिथे त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल, असे शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले.

कृषी कायद्याविरुद्ध सुरु असलेल्या या आंदोलनामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर वाहतुक कोंडी झाली आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले असून या वाहतुक कोंडीसाठी सरकारने लवकरात लवकर मार्ग काढावा, असे सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, शनिवारी कर्नाळ येथे झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कार्यकर्त्ये योगेंद्र यादव यांनी दिली. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुशील काजल असे असून तो रामपूर जतन या गावचा रहिवासी होता. या मृत पावलेल्या व्यक्तीच्या निधनासाठी हरियाणा पोलिस जबाबदार आहेत. या व्यक्तीला वारंवार डोक्यावर मारल्यामुळे त्याचे निधन झाले, अशी माहिती शिरोमणी अकाली दलचे प्रमुख मनजिंदर सिंह यांनी दिली.