पक्षातील एका महिला नेत्याने केलेल्या लैंगिक छळाच्या गंभीर आरोपानंतर तेलुगु देसम पक्षाने (TDP) सत्यवेदू आमदार कोनेती आदिमुलम (Koneti Adimulam) यांना निलंबित (Satyavedu MLA Suspended) केले आहे. पीडितेने टीडीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्याशी संपर्क साधून आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली होती. तक्रारीला तत्काळ प्रतिसाद देत टीडीपी नेतृत्वाने आदिमुलम यांना निलंबित केले. आंध्र प्रदेश टीडीपीचे (Telugu Desam Party) अध्यक्ष पल्ला श्रीनिवास राव यांनी गुरुवारी अधिकृत निवेदन जारी केले आणि आरोपांनंतर काही तासांनी 66 वर्षीय आमदाराचे निलंबन जाहीर केले.
आमदारावर महिलांसोबत गैरवर्तन आणि वारंवार छळ केल्याचा आरोप
निलंबीत आमदार कोनेती आदिमुलम हे टीडीपीच्या चिन्हावर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्यवेदू विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. दरम्यान, पाठिमागील अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर महिलांसोबत गैरवर्तन आणि वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. पीडित महिला नेत्याने प्रसारमाध्यमांसमोर येत आमदाराने केलेल्या कथीत छळाबद्दल जाहीरपणे सांगितले होते. ज्यामध्ये शारीरिक आणि मानसीक छळासोबतच वारंवार फोन करुन धमकावण्यापर्यंतच्या बाबींचा समावेश आहे. (हेही वाचा, Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूकीपुर्वी चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी)
पीडित महिला आणि कुटुंबास जीवे मारण्याची धमकी
पीडित महिला नेत्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेकी, “तो आमदार मला अनेक वेळा कॉल करायचा. कधी कधी एका रात्रीत 100 वेळाही त्याने मला कॉल केले आहेत. एका प्रसंगी, त्याने मला तिरुपतीमधील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि मला अनुचित कृत्ये करण्यास भाग पाडले,” असेही महिलेने पत्रकारांना सांगितले. तिने पत्रकारांशी बोलताना हे देखील सांगितले की, घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केली तर तिला आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याचीही धमकी आदिमुलमने दिली होती. (हेही वाचा, Haryana Shocker: हरियाणामध्ये 500 मुलींचा प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप; मुख्यमंत्री Manohar Lal Khattar यांना लिहिले पत्र)
त्रासाला कंटाळून कथीत अत्याचाराला फोडली वाचा
स्वत:चा जीव आणि कुटुंबाची सुरक्षा आदी कारणांमुळे आपण बराच काळ गप्प राहिलो. मात्र, त्याचा त्रास असहय्य झाल्याने आपण त्याच्या कृत्यांचा पर्दाफाश करण्याचे आणि घडलेले सत्य सर्वांसमोर आमण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन माझ्याप्रमाणेच अनेक महिला त्याच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. त्यांनाही पुढे येऊन बोलण्याचे बळ मिळेल. दरम्यान, ही घटना पुढे येताच, आंध्र प्रदेशातील राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, आदिमुलम यांनी यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी (YSRCP) चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, वायएसआरसीपीचे प्रमुख वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला.