टॅक्सी चालकाची हुशारी, आठ दिवस एका ठिकाणी पाळत ठेवून भामट्यांची तुरुंगात रवानगी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

राजधानी दिल्लीमध्ये मोबाईल चोरीला गेल्यास तो पुन्हा आपल्याला मिळेल याची अपेक्षा करणे मुश्किलच आहे. मात्र अशीच एक घटना महिपालपुर येथे एका टॅक्सी चालकासोबत झाली आहे. परंतु टॅक्सी चालकाच्या हुशारीमुळे त्याला त्याचा भामट्यांनी चोरलेला मोबाईल पुन्हा मिळाला आहे.

नवीन वर्षाच्या रात्री महिपालपुर येथे एक टॅक्सी चालक रात्रीच्या वेळेस दिवसभर काम करुन तेथील एका ठिकाणी झोपला होता. जवळजवळ मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास दोन भामट्यांनी झोपलेल्या टॅक्सी चालकाचा मोबाईल चोरुन तेथून पळ काढला. त्यावेळी झोपून खडबडून जागे झालेल्या टॅक्सी चालकाने या भामट्यांचा पाठलाग केला पण अखेर ते त्याचा हाती लागले नाहीत. त्यामुळे टॅक्सी चालकाने आपला मोबाईल परत मिळेल याची अपेक्षा सोडली नाही. त्याने भामट्यांना अद्दल घडविण्याचे ठरविले. या प्रकरणी पीडित टॅक्सी चालकाने भामट्यांना पकडण्यासाठी एक युक्तीवाद केला. (हेही वाचा- एटीएमच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या महिलेने तब्बल 17 दिवस पाळत ठेवून चोराला पकडले)

ज्या ठिकाणाहून चालकाचा मोबाईल चोरीला गेला त्या ठिकाणी या चालकाने सातत्याने आठ दिवस तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवली. सुरुवातीला एक दोन दिवस निराशा हाती आली. परंतु तरीही चालकाने आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि अखेर आठव्या दिवशी पुन्हा त्याच जागेवर येऊन बसला. काही वेळानंतर या ठिकाणी ते दोन भामटे त्याच्या निदर्शनास आले. त्यावेळी चालकाने आपल्या मित्राच्या सहाय्याने या दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि पोलिसांकडे दिले.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींनी अटक केली आहे. तसेच चालकाचा मोबाईल ज्या व्यक्तिला विकला त्यालाही अटक करण्यात आली आहे. या मोबाईल चोरीमुळे भामट्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.