![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/gjhjdx-45-.jpg?width=380&height=214)
तमिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर अली आहे. तमिळनाडूच्या कृष्णगिरी (Krishnagiri) जिल्ह्यातील एका सरकारी माध्यमिक शाळेत तीन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याचा आरोप आहे. यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (DEO) या तिन्ही शिक्षकांना निलंबित केले, तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली अटक केली आहे. कृष्णगिरीचे जिल्हाधिकारी सी दिनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर आरोपी शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. ही मुलगी जवळजवळ एक महिना शाळेत गैरहजर होती, त्यांनतर मुख्याध्यापकांनी चौकशी केली तेव्हा तिच्या आईने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
वृत्तानुसार, मुलगी जवळजवळ एक महिना शाळेत गैरहजर होती. जेव्हा मुख्याध्यापकांनी तिच्या कुटुंबियांना ती शाळेत न येण्याचे कारण विचारले तेव्हा, मुलीच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीला खूप पोटदुखी होत आहे त्यामुळे ती शाळेत येत नाही. पण जेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली, तेव्हा कुटुंबीयांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या सूचनेवरून मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. तसेच, प्रकरणाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. यानंतर मुख्याध्यापकांनी याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी आणि बाल हेल्पलाइनला माहिती दिली. महिला पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (DEO) तिन्ही शिक्षकांना निलंबित केले आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी घडली. सध्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण युनिटने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. (हेही वाचा: Muzaffarnagar Gang Rape: तरुण मेहुणी पाहून विकृती संचारली, सामूहिक बलात्कार करुन हत्या केली; मुझफ्फरनगर येथील खळबळजनक घटना)
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीही जिल्ह्यातून असाच एक प्रकार उघडकीस आला होता. येथील कथित 'बनावट एनसीसी कॅम्प'च्या आयोजकाने 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. मात्र त्यानंतर आरोपीने आत्महत्या केली.