आतापर्यंत सर्वसाधारणपणे आपण मुलाने अल्पवयीन मुलीला पळवून नेत्याच्या घटना ऐकल्या असतील, मात्र आता चेन्नईमध्ये (Chennai) याच्या अगदी उलट प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडू (Tamil Nadu) पोलिसांनी एका मुलीला अटक केली आहे. तिच्यावर लैंगिक शोषण (Sexual Assault) आणि अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण कोईम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाची (Pollachi) भागातील आहे. येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या 19 वर्षीय मुलीने काही महिन्यांपूर्वी एका 17 वर्षांच्या मुलाशी मैत्री केली होती. यानंतर दोघेही 26 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाले.
याबाबत मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढे या दोघांनी लग्न केल्याचे तपासात उघड झाले. ते कोयंबटूरमध्ये एकत्र राहत आहेत. आता पोलिसांनी सांगितले की, मुलीला 17 वर्षांच्या मुलाशी लग्न आणि लैंगिक अत्याचार केल्याबद्दल POCSO (Protection of Children from Sexual Offences) कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कलम 5 (I) आणि 6 कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीला विशेष न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर तिला कोयंबटूर मध्यवर्ती कारागृहात पाठवले व मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत नापास झाल्यानंतर मुलीने आपला अभ्यास सोडला आणि पेट्रोल पंपावर काम करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी हा तरुणही पेट्रोल पंपावरही काम करायचा. मुलगी मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत डिंडीगुलला गेली. गुरुवारी डिंडीगुलमध्ये त्यांचे लग्न झाले आणि कोयंबटूरला परतले. या ठिकाणी ते भाड्याच्या घरात राहू लागले. मुलाच्या आईने शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली. (हेही वाचा: गर्भवती बायकोला जिवंत जाळण्याचा नवऱ्याचा प्रयत्न, काही महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह)
जेव्हा या मुलीला तक्रारीबाबत माहिती मिळाली तेव्ह तिने पोल्लाची येथील महिला पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. दरम्यान, शहरातील बाल क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ मनोज रघुनाथन म्हणाले की अशी प्रकरणे सामान्य नाहीत. मुलाचे तसेच मुलीचेही योग्य समुपदेशन केले पाहिजे.