Photo Credit- X

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील एका महिलेने परिसरात सात संशयित व्यक्ती पाहिल्यानंतर जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मूमधील लष्करी शाळा शनिवारपर्यंत बंद राहतील. सुरक्षेसाठी महत्त्वाच्या लष्कर आणि संरक्षण आस्थापनांवर सुरक्षा उपाय वाढवण्यात आले आहेत. पंजाब पोलिसांनी शोध मोहिमेत मदत करण्यासाठी एका संशयिताचे रेखाचित्रही प्रसिद्ध केले आहे. पठाणकोट जिल्हा जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्याला लागून आहे. रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित तक्रार करा. (हेही वाचा - कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी Kargil War Memorial येथे पुष्पहार अर्पण करत शहिदांना वाहिली श्रद्धांजली)

संशयितांना पाहणाऱ्या महिलेने पोलिसांना माहिती दिली होती की, फांगटोली गावात सात 'संशयास्पद' लोक तिच्या घरी आले, त्यांनी तिच्याकडे पाणी मागितले आणि काही वेळाने ते निघून गेले. गुरुवारी रात्री पुन्हा एकदा फांगटोलीत संशयितांच्या हालचाली झाल्या. सुमारे दोन तास संशयित फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा तीन संशयित फांगटोली गावातील एका घरात भिंतीवर चढून घुसले आणि भाकरी मागू लागले. कुटुंबीयांनी भीतीने दार उघडले नाही. बलराम सिंह यांनी सांगितले की, तीन लोक भिंतीवरून उडी मारून त्यांच्या घरी आले आणि खोलीचा दरवाजा ठोठावू लागले. भीतीमुळे त्याने दरवाजा उघडला नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचे बलराम सिंह यांनी सांगितले. माहिती मिळाल्यानंतर, पोलीस आणि कमांडो दलाने प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला.

गावात संशयित दिसल्यापासून पोलीस आणि लष्कराने शोधमोहीम राबवली, मात्र आजतागायत काहीही हाती लागलेले नाही. संशयितांच्या हालचालींमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे.