Anil Ambani (Photo Credits: PTI)

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (Reliance Communications) चेअरमन अनिल अंबानी (Anil Ambani) यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. देशातील दूरसंचार जाळं वापरण्याबद्दल झालेल्या व्यवहारात उर्वरीत रक्कम व व्याज मिळून 550 कोटी रुपये देण्याबाबत एरिक्सने रिलायन्स कम्युनिकेशनविरुद्ध आव्हान याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात आज (बुधवार, 20/2/1019) याचा निर्णय देण्यात आला. सुप्रीम कोर्टाने हा निकाल एरिक्सन इंडियाच्या बाजूने देत अनिल अंबानींना मोठा झटका दिला आहे. अनिल अंबानी यांनी थकवलेले 453 कोटी रुपये भरावे अन्यथा तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगण्यास तयार व्हावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ही रक्कम भरण्यासाठी त्यांना चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. (अनिल अंबानी यांची Rcom दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, अंबानी समूह कंपन्यांमध्ये खळबळ, 54 टक्क्यांनी घसरला आरकॉमचा शेअर)

अनिल अंबानींसह दोन संचालकांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अपमान केल्यास तिघांनाही प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड न भरल्यास एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

रिलायन्स कम्युनिकेशन्सवर एरिक्सन इंडियाचं एकूण 15.8 कोटी डॉलरचं कर्ज आहे. रिलायन्स कम्युनिकेशनने आमचे 1500 कोटी रुपये दिले नसल्याचा आरोप एरिक्सन इंडियाने केला आहे. 7.9 कोटी डॉलर एरिक्सन इंडियाला देण्याचा आदेश कोर्टाने दिला होता मात्र त्याचेही रिलायन्स कम्युनिकेशन्सने उल्लंघन केले आहे.