T Raja Singh | (Photo credit: Twitter)

सुप्रीम कोर्टाने यवतमाळ, महाराष्ट्र आणि रायपूर, छत्तीसगड येथील जिल्हा दंडाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समिती आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आमदार टी राजा सिंह यांच्या आगामी रॅलींमध्ये संभाव्य द्वेषयुक्त भाषणांबद्दलच्या चिंतेवर योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने या वेळी द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचार विरुद्ध प्रतिबंधात्मक पावले उचलण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने याबातब निर्देश जारी केले आहेत. यवतमाळमध्ये 18 जानेवारी रोजी हिंदू जनजागृती समिती आणि रायपूरमधील भाजप आमदार टी राजा सिंह यांच्या रॅलींमध्ये संभाव्य द्वेषयुक्त भाषणे झाल्याचा आरोप आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपायांची मागणी करणारा एक अर्ज न्यायालयाकडे दाखल झाला होता. या अर्जाला उत्तर म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत.

नियोजित रॅलींदरम्यान हिंसाचार किंवा द्वेषयुक्त भाषणाला उत्तेजन देणार नाही याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने जिल्हा दंडाधिकार्‍यांना "योग्य पावले" उचलण्याचे निर्देश दिले. परवानगी नाकारण्यास नकार देताना खंडपीठाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अत्यावश्यक परिस्थितीत, रॅलीच्या ठिकाणी रेकॉर्डिंग क्षमतेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलिसांना करण्यात आले आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडल्यास चुकीचे कृत्य करणाऱ्यांची ओळख पटविण्यात मदत होईल. (हेही वाचा, T Raja Singh in Preventive Custody: भाजपचे निलंबीत आमदार टी राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, हनुमान जयंती मिरवणुकीपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई)