Sukesh Chandrashekhar (PC - Twitter/ @4pmnews_network)

Sukesh Chandrasekhar Writes to FM Nirmala Sitharaman: दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद ठग सुकेश चंद्रशेखरशी (Conman Sukesh Chandrasekhar) संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. सुकेश चंद्रशेखर याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना एक पत्र लिहिल्याचे बोलले जात आहे. यामध्ये, त्याला त्याच्या परदेशी उत्पन्नावर तब्बल 7,640 कोटी रुपये कर भरायचा आहे. त्याचे उत्पन्न सुमारे 22,410 कोटी रुपये (सुमारे $ 2.7 अब्ज) आहे. या उत्पन्नाबाबत त्याने सांगितले की, त्याने 2024-25 या आर्थिक वर्षात त्याच्या दोन परदेशी कंपन्यांमधून ही कमाई केली आहे.

जाणून घ्या या कंपन्या कोणत्या आहेत-

सुकेशने दावा केला आहे की, त्याच्या दोन परदेशी कंपन्या, एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल (नेवाडा, यूएसए) आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटिश व्हर्जिन आयलंड) 2016 पासून कार्यरत आहेत. या कंपन्या ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या क्षेत्रात काम करतात. सुकेशने सांगितले की, त्याचा व्यवसाय अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँग सारख्या अनेक देशांमध्ये पसरलेला आहे आणि 2024 मध्ये या कंपन्यांकडून 2.7 अब्ज डॉलर्स कमावले आहेत.

भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली-

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखर याने आपल्या पत्रात लिहिले आहे की, या उत्पन्नावर कर भरण्यासोबतच त्याला भारतातील तंत्रज्ञान आणि ऑनलाइन कौशल्य गेमिंग क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. त्याने असेही सांगितले की, त्याचे उत्पन्न पूर्णपणे ‘कायदेशीर’ आहे आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग कायद्यांचे पालन करते. (हेही वाचा: TCS Q3 Results: टीसीएसने जारी केले डिसेंबर तिमाहीचे निकाल; निव्वळ नफा 12,380 कोटी रुपये)

सुकेश चंद्रशेखरवरील आरोप-

सुकेश चंद्रशेखर याच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप आहेत. जवळजवळ 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्याची चौकशी करत आहे. हे प्रकरण रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मलविंदर सिंग यांच्या पत्नींची 200 कोटी रुपयांची फसवणूक करण्याशी संबंधित आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर एजन्सीही त्याच्यावर अनेक खटले चालवत आहेत. सुकेशवर श्रीमंतांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेश चंद्रशेखर हा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतच्या नात्याच्या अफवांमुळेही चर्चेत होते. मात्र, जॅकलिनने या अफवांचे अनेकदा खंडन केले आहे.