हरियाणा (Haryana) मधील गुरुग्राम (Gurugram) शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. खाजगी शाळेत 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक ओरडल्यामुळे 15 वर्षीय विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. वर्गमित्रांसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने आणि त्यामुळे निराश असलेल्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलले. (विद्यार्थ्याची ऑनलाईन फोन खरेदी केल्याने फसवणूक, 18 वर्षीय मुलाने नैराश्यातून केली आत्महत्या)
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नखं न कापल्याने, मोबाईल फोन बाळगल्याने आणि मोठे कानातले घातल्याने शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थीनीला वर्गमित्रांसमोर ओरडले. त्यांनी विद्यार्थीनीला कानाखालीही मारली. तसंच तिची तक्रार पालकांकडे केली. तुमची मुलगी बेशिस्त वागत असून तिला शाळेतून काढून टाकण्यात येईल, असे मुख्याध्यापकांनी विद्यार्थीनीच्या पालकांना सांगितले.
रिपोर्टनुसार, ही घटना मुख्याध्यापक विद्यार्थीनीला ओरडल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी घडली. दरम्यान, पालकांनी मुख्याध्यापकांची भेट घेतली. परंतु, त्यांनी विद्यार्थीनीसह तिच्या भावाला देखील शाळेतून काढले जाईल, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. यानंतर विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या भावाने तिला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सर्वप्रथम पाहिले.
घटनेनंतर मृत विद्यार्थीनीच्या पालकांना भेटायला गेलेल्या तिच्या वर्गमित्रांनी देखील मुख्याध्यापकांच्या गैरवर्तनाबद्दल सांगितले. काही विद्यार्थ्यांनी तिच्या सोबत झालेल्या प्रसंगाची पृष्टी देखील केली आहे. (धक्कादायक! कुटूंबातील आजारपणाला कंटाळून एका तरुणीने आई आणि कोमात असलेल्या भावाला अन्नातून विष देऊन संपवलं, त्यानंतर केली आत्महत्या)
आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल मृत विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 306 अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखळ केला असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.